Join us  

'गोल'माल... पिझ्झा बेचव असल्यानं पैसे परत घ्यायला गेली अन् 27 हजार गमावून बसली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 12:42 PM

अन्नपदार्थ ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अशा पद्धतीने पिझ्झा मागवणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

मुंबई - अन्नपदार्थ ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अशा पद्धतीने पिझ्झा मागवणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. पिझ्झा बेचव असल्याने रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणीच्या बँक खात्यातून रक्कम गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील एका तरुणीने पिझ्झा बेचव असल्याने पैसे परत घेण्याच्या नादात बँक खात्यातून तब्बल 27 हजार गमावले आहेत.

आयआयटीची विद्यार्थिनी असलेल्या 25 वर्षीय सीचा वाजपेयी हिने पिझ्झा ऑर्डर केला होता. डिलिव्हरी बॉय जेव्हा पिझ्झाची ऑर्डर घेऊन आला तेव्हा सीचाला ऑर्डर केलेल्या पदार्थाचा दर्जा आवडला नाही. तो बेचव लागला. त्यामुळे तिने रिफंड मिळवण्यासाठी कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करून ज्या सूचना मिळतील त्या फॉलो केल्या असता तिला बँक खात्यातील 27 हजार गमवावे लागले आहेत. याप्रकरणी सीचाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी सीचा वाजपेयी हिने आयआयटी पवई येथील वसाहतीत एक पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र पिझ्झाची चव आणि दर्जा आवडला नसल्याने तिने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्याबाबत तक्रार केली. तिला तिथे कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने कस्टमर केअरला कॉल करण्याचा निर्णय घेतला. रिफंड मिळवण्यासाठी तिने कस्टमर केअरने सांगितलेल्या लिंकवर क्लिक करून आपला तपशील दिला. मात्र यानंतर काही वेळातच तिच्या बँक खात्यातून काही हजार कमी झाल्याची तिला माहिती मिळाली. सीच्याच्या खात्यातून फ्रॉड करून तब्बल 27 हजार काढण्यात आले आहेत. 

'पैसे रिफंड मिळावे यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्यावर कॉल केला. पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही मिनिटांनी एका नंबरवरून कॉल आला. कॉल केलेल्या व्यक्तीने ऑनलाईन फूड सर्व्हिस कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचं सांगितलं. तसेच पैसे परत देतो असं सांगितलं. मात्र यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती देण्याचा सल्ला दिला. माझा मोबाईल नंबर आणि किती रक्कम रिफंड म्हणून हवी आहे ते यूपीआय पिनच्या मदतीने दिलं. मात्र यानंतर तीन ट्रान्सझेक्शन्स करण्यात आले आणि माझ्या खात्यातून 27 हजार कमी झाले. परत त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता तो फोन स्विच ऑफ होता' अशी माहिती सीचाने पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :मुंबईऑनलाइनबँकधोकेबाजीपोलिस