Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:13 IST

मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, प्रक्रियेतील गुंतागुंतीचा नागरिकांना फटका 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील आरटीओ सेवा ‘सारथी’ आणि ‘वाहन ४.०’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत प्रक्रिया सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न असला, तरी प्रत्यक्षात नागरिक आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे मारत आहे. ऑनलाइन तब्बल १०५ सेवा उपलब्ध असूनही तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे नागरिकांची गैरसोय कायम आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, नूतनीकरण, पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी, ई-चलान, वाहन मालकी हस्तांतरण अशा महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र, अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी, बायोमेट्रिक नोंदणी, फोटो-स्वाक्षरी किंवा अंतिम मंजुरीसाठी अनेकदा प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक ठरते. त्यामुळे ‘ऑनलाइन’ प्रक्रिया पूर्णपणे घरबसल्या होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

‘सारथी’वर लायसन्ससाठी स्लॉट मिळविण्यात अडचण

‘सारथी’ पोर्टलवर लर्निंग आणि कायमस्वरूपी लायसन्ससाठी स्लॉट मिळण्यात अडचणी येत असल्याचे अनेकांनी सांगितले. काही वेळा वेबसाइट मंद गतीने चालणे, पेमेंट फेल होणे किंवा अर्ज सबमिट न होणे अशा तांत्रिक समस्यादेखील वारंवार उद्भवतात. परिणामी नागरिकांना पुन्हा आरटीओ कार्यालयात जावे लागते.

‘ना हेलपाटे, ना एजंट’ मोहीम केवळ कागदावर 

काही आरटीओ कार्यालयांमध्ये तांत्रिक सहाय्य केंद्रे (हेल्पडेस्क) अपुरी असल्याने नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी ऑनलाइन प्रक्रिया अधिक क्लिष्ट ठरत असल्याचेही समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता आणि वेग वाढण्याची क्षमता आहे; मात्र त्यासाठी पोर्टलची कार्यक्षमता सुधारणे, स्लॉट उपलब्धता वाढवणे आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. अन्यथा ‘ना हेलपाटे, ना एजंट’ हा उद्देश केवळ कागदावरच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फिटनेससाठी वाहन दाखविणे अनिवार्य

‘वाहन ४.०’ प्लॅटफॉर्मवर वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, फिटनेस प्रमाणपत्र, परवाने आणि ई-चलान यांसारख्या सुविधा असल्या, तरी काही सेवांसाठी स्थानिक आरटीओकडून प्रत्यक्ष तपासणी आवश्यक असते. विशेषतः वाहन ट्रान्सफर, हायपोथेकशन (कर्ज) काढणे किंवा फिटनेससाठी वाहन प्रत्यक्ष दाखवावे लागते.

‘या’ कारणामुळे अनेकदा नाकारतात अर्ज

ऑनलाइन प्रक्रिया असूनही अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची अचूक माहिती नसते. त्यामुळे अर्ज नाकारला जाणे, पुन्हा प्रक्रिया करावी लागणे किंवा एजंटची मदत घ्यावी लागणे असे प्रकार घडतात. एजंटकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही कायम आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai RTO Online Services: Citizens Still Struggle with Office Visits

Web Summary : Despite online RTO services, Mumbaikars still visit offices due to technical issues, incomplete information, and complex procedures. Services like license and registration require mandatory physical presence for verification, causing inconvenience. The 'no visits, no agents' initiative remains largely ineffective.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र