मुंबईतील वरळी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दोन स्थानिक तरुणांनी डेअरी वर्कर्स कॉलनीतील एका पोलिस कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी ही चोरी केली. सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाईल फोनसह एकूण अंदाजे ४० हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना १७ एप्रिलच्या पहाटे घडली.
नायगाव येथील सशस्त्र पोलीस शाखेत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले प्रमोद विश्वनाथ कांबळे (वय, ४५) यांच्या घरी दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कांबळे हे आपल्या कुटुंबासह वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान रोडवरील तात्पुरत्या सरकारी निवासस्थानात राहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिलच्या रात्री कांबळे आणि त्यांची पत्नी वाशी येथील एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशीरा कांबळे कुटुंब घरी परतले आणि मध्यरात्री १.०० वाजताच्या सुमारास झोपायला गेले. त्यानंतर पहाटे २.४५ वाजताच्या सुमारास कांबळे यांना असामान्य आवाजाने जाग आली. खोली तपासली असता त्यांना स्थानिक रहिवासी अक्कू उर्फ हुसेन साजिद खान (वय, २२) आणि आरिफ उर्फ सोनू मोहम्मद अब्बास शेख (वय, ३२) असे दोन व्यक्ती घरात दिसले. कांबळे यांना पाहताच दोघांनी धूम ठोकली. त्यावेळी कांबळे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघेही पळून गेले.
कांबळे कुटंब झोपत असताना चोरट्यांनी खिडकीची काच काढून घरात प्रवेश केला. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातून ग्रॅम वजनाचे आणि २५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किंमतीचा रेडमी नोट १०टी आणि पाच हजार रुपये किंमतीचा पोको सी५० हे दोन मोबाईल फोनही चोरी झाले. चोरीला गेलेल्या सर्व वस्तूंची एकूण किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे.