CoronaVirus News: सर्व विक्रम मोडीत! मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; आकडेवारीनं चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 21:34 IST2021-03-28T21:32:27+5:302021-03-28T21:34:32+5:30
CoronaVirus News: दिवसभरात जवळपास सात हजार कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईकरांची चिंता वाढली

CoronaVirus News: सर्व विक्रम मोडीत! मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; आकडेवारीनं चिंता वाढवली
मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना मृतांचा आकडा ११ हजार ६४९ वर पोहोचला.
'...तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा', मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
काल दिवसभरात शहरात ६ हजार १२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर १२ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज कोरोना रुग्णांचा आकडा थेट ७ हजारांजवळ पोहोचला आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांचा सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
...तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून निर्वाणीचा इशारा
लॉकडाऊनचं नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
आज आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा, यावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडताहेत, मृत्यूंची संख्या वाढू शकते...
या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.
ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.