मुंबईतील घरभाडे तब्बल ३० टक्क्यांनी वाढले, पश्चिम उपनगरात दर का वाढले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:11 IST2025-02-25T14:10:50+5:302025-02-25T14:11:38+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या तेजीने पुनर्विकास सुरू आहे. यामुळे घरभाड्यामध्ये वर्षभरात ३० टक्के वाढ झाली आहे.

मुंबईतील घरभाडे तब्बल ३० टक्क्यांनी वाढले, पश्चिम उपनगरात दर का वाढले?
मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या तेजीने पुनर्विकास सुरू आहे. यामुळे घरभाड्यामध्ये वर्षभरात ३० टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ ठरली आहे. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे.
मुंबईतील शहरातील अनेक इमारतींना किमान ५० ते ६० वर्षे, तर उपनगरांतील अनेक इमारतींनाही ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे येथे रहिवाशांना इमारतींच्या पुनर्विकासाचे वेध लागले आहेत.
त्याच परिसरात भाड्याचे घर हवे!
ज्यावेळी इमारत पुनर्विकासासाठी जाते त्यावेळी नवी इमारत पूर्ण होईपर्यंत संबंधित इमारतींमधील नागरिकांना विकासकातर्फे दर महिन्याचे घरभाडे दिले जाते. अशा इमारतीमधील बहुतांश लोकांचा पुनर्विकासाच्या काळात मुलांच्या शाळा तसेच दैनंदिन कामाच्या व्यवस्था यामुळे त्याच परिसरातच भाड्याने घर घेण्याकडे कल असतो.
५० हजार ते सव्वा लाख भाडे
पश्चिम उपनगरांत अनेक इमारतींचा पुनर्विकास होत असल्यामुळे एकाचवेळी अनेकांना त्याच विशिष्ट परिसरात घर हवे आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित यामुळे या घरांच्या भाड्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे विश्लेषण केले जाते. सध्या मुंबईत परिसरनिहाय किमान ५० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत विकासकांतर्फे भाडे दिले जाते.
वर्षाकाठी ८ ते १० टक्के भाडेवाढ करण्याची अट
१. मुंबईत सध्या पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प हे पश्चिम उपनगरातील आहेत. त्यामुळे तेथील घरांच्या किमतीमध्ये आधीच वाढ झाली आहे.
२. या वाढीव किमतीमुळेही भाड्याच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, एखादा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो.
३. त्यामुळे ज्यांनी घर भाड्याने दिले आहे त्यांनी देखील मार्केटची गरज ओळखून वर्षाकाठी किमान ८ ते १० टक्के भाडेवाढ करण्याची अट टाकल्याचे दिसते.