मुंबई: २०२५ ला निरोप देऊन संपूर्ण जग २०२६ च्या स्वागतात मग्न असताना, मुंबईकरांना निसर्गाने एक अनोखे सरप्राईज दिले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे मुंबईच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन थंडीच्या दिवसांत आलेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
सरत्या वर्षाला निरोप देऊन अनेक मुंबईकर झोपेत असताना किंवा काही उत्साही नागरिक पार्ट्या करून घरी परतत असताना पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, वाळकेश्वर, दादर या भागांसह प्रभादेवी आणि लोअर परळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यात होईल अशी अपेक्षा असताना, पावसाच्या आगमनाने वातावरणात अधिकच गारवा निर्माण झाला आहे.
गुरुवारी पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करून घरी परतणाऱ्या तरुणांची या पावसामुळे मोठी धावपळ झाली. छत्री किंवा रेनकोट सोबत नसल्याने अनेक प्रवाशांना आडोसा शोधावा लागला. विशेषतः दादर आणि सीएसएमटी स्थानक परिसरात प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाले.
हवामानातील बदलाचा परिणाम
डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईत थंडीचा कडाका जाणवत असतो. मात्र, अरबी समुद्रातील हवामानातील बदलांमुळे हा अनपेक्षित पाऊस पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नववर्षाची सुरुवात पावसाने झाल्याने सोशल मीडियावरही 'Rain in Mumbai' च्या चर्चांना उधाण आले आहे. काहींनी याला 'शुभशकून' मानले आहे, तर काहींनी वातावरणातील या बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पुढील काही तास मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Web Summary : Mumbai welcomed 2026 with unexpected rain. The downpour surprised residents amidst the cold, disrupting morning commutes and New Year celebrations. The weather department forecasts continued cloudy conditions and light rain.
Web Summary : मुंबई ने अप्रत्याशित बारिश के साथ 2026 का स्वागत किया। ठंड के बीच हुई बारिश से निवासियों को आश्चर्य हुआ, जिससे सुबह की यात्रा और नए साल का जश्न बाधित हुआ। मौसम विभाग ने बादल छाए रहने और हल्की बारिश जारी रहने का अनुमान जताया है।