Mumbai Portion of Bhanushali building at Fort collapses search operation underway | Mumbai Building Collapse: फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश

Mumbai Building Collapse: फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. (Mumbai Building Collapse)

आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं असून दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर इमारतीच्या उर्वरित भागातील लोकांना असलेला धोका ओळखून १३ जणांना बाहेर काढलं गेलं आहे. सध्याच्या घडीला अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. 


फोर्टमधील पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती पावणे चारच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सध्याच्या घडीला अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही  जण दबल्याची माहिती प्रत्यक्षदर्शांनी दिली. त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलानं सुरू केलं आहे. या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळ असलेल्या भानुशाली इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला. इमारत जीर्ण झाल्यानं तिला अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास इमारत कोसळेल अशी भीती वास्तव्यास असलेल्या लोकांना वाटू लागली. त्यामुळे काही जण इमारतीच्या बाहेर आले. त्यानंतर काही वेळेतच इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आता उर्वरित इमारतीत राहात असलेल्यांना इतरत्र हलवण्याचं काम सुरू झालं आहे. यासोबतच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbai Portion of Bhanushali building at Fort collapses search operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.