मुंबई पोर्ट ट्रस्टचा एकहाती दबदबा; कामगार कबड्डी महिलांमध्ये ‘बीओबी’ विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:47 IST2024-02-07T10:43:49+5:302024-02-07T10:47:22+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टने राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या पुरुष शहरी गटाचे जेतेपद पटकावले.

मुंबई पोर्ट ट्रस्टचा एकहाती दबदबा; कामगार कबड्डी महिलांमध्ये ‘बीओबी’ विजयी
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना बँक ऑफ बडोदा (बीओबी) संघाचा ३५-२१ असा पराभव केला. यासह मुंबई पोर्ट ट्रस्टने राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या पुरुष शहरी गटाचे जेतेपद पटकावले. महिलांमध्ये बीओबी संघाने दबदबा राखत जेतेपदावर नाव कोरले.
प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवन मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या पुरुष शहरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्टने मध्यंतराला २१-११ अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली. यानंतर बीओबी संघाने जोरदार प्रत्युत्तर देत सामन्यात रंग भरले; मात्र त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टचा भक्कम बचाव भेदण्यात यश
आले नाही.
सौरभ राऊत, ज्ञानेश्वर जाधव यांनी खोलवर चढाया, तर कृष्णा पवारच्या भक्कम पकडी मुंबई पोर्टच्या विजयात मोलाच्या ठरल्या.
बीओबीकडून गजानन, चिन्मय गुरव आणि संभाजी बाबरे यांचा खेळ चांगला झाला
.
महिला खुल्या गटात मात्र बीओबीने जेतेपदावर नाव कोरताना आर. बी. स्पोर्ट्सचा ५०-१६ असा धुव्वा उडवला.
मध्यंतरालाच बीओबीने २६-१० अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता.
त्याचवेळी, पुरुष ग्रामीण गटामध्ये जेएसडब्ल्यू डोलवी संघाने १९-१० अशी बाजी मारत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक संघाचा पराभव केला.
डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद पटकावले.