Join us

बंदर आधुनिकीकरण, सागरी व्यापार, ‘एआय’साठी ७८ हजार कोटींचे करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 06:48 IST

बंदरे, शिपिंगशी संबंधित सर्व कार्यालयांसाठी मेरिटाइम आयकॉनिक स्ट्रक्चर उभारणार

मुंबई : इंडिया मेरिटाइम सप्ताहामध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरणाने हजारो कोटी रुपयांचे विविध सामंजस्य  करार करून बंदर आधुनिकीकरण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान विकास आणि डिजिटायझेशन  यावर भर दिला आहे. 

मुंबई पोर्ट प्राधिकरणाने इंडिया मेरिटाइम सप्ताहात सुमारे ७० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांद्वारे ७८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.  या सामंजस्य करारांच्या माध्यमातून बंदरांचे आधुनिकीकरण, बंदराधारित औद्योगिकीकरण, शिपिंग, व्यापार आणि व्यवसाय, जहाज बांधणी व दुरुस्ती, ज्ञान हस्तांतरण, तंत्रज्ञान विकास आणि डिजिटलायझेशन याला बळ मिळणार आहे. तसेच मुंबई पोर्ट प्राधिकरणामध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी केलेल्या सामंजस्य करारामुळे चांगला लाभ होईल, असे मत मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. संजय जोगळेकर यांनी व्यक्त केले.

मुंबईत सर्व बंदर आणि शिपिंगशी संबंधित कार्यालये एकत्र आणण्यासाठी “मेरिटाइम आयकॉनिक स्ट्रक्चर” प्राधिकरणाकडून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हुडकोला प्रमुख विकास भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. 

दरम्यान, भारतीय सागरी विद्यापीठाने १४ आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जर्मनी, सिंगापूर, नेदरलँड्स तसेच इतर देशांतील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांबरोबर हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

‘क्रूझ डेस्टिनेशनमध्ये पहिल्या दहात भारताला आणणार’

मुंबई : मेरिटाईम अमृतकाल व्हिजन २०४७ अंतर्गत भारताची क्रूझ आणि प्रवासी अर्थव्यवस्था नव्या युगात प्रवेश करत आहे. या व्हिजनचा उद्देश भारताला जगातील टॉप १० क्रूझ डेस्टिनेशन म्हणून स्थान मिळवून देणे आहे. पोर्टस्, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालय क्रूझ भारत मिशनद्वारे सहा प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रूझ हब, ३५ लहान टर्मिनल्स आणि ५० हून अधिक नदी क्रूझ मार्ग विकसित करत आहे, ज्यामुळे किनारी आणि अंतर्गत पर्यटनाला चालना मिळेल, असे देशाच्या बंदरे, जहाज उद्योग व जलवाहतूक मंत्रालयाचे सचिव विजय कुमार म्हणाले. 

मुंबई पोर्ट प्राधिकरणातर्फे  “क्रूझ आणि प्रवासी अर्थव्यवस्था-एक नवी दिशा” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले. या सत्राचे मुख्य अतिथी म्हणून कुमार बोलत होते. यावेळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी प्रवासी अर्थव्यवस्थेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले, तर आयपीएचे सल्लागार राजीव जलोटा यांनी क्रूझ भारत मिशनचा संक्षिप्त आढावा घेतला. 

कुमार म्हणाले, २०४७ पर्यंत सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, व्यवसाय सुलभता, शाश्वतता आणि खासगी सहभाग यावर भर दिला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, रोपॅक्स सेवांचा विस्तार यामुळे कनेक्टिव्हिटी आणि प्रवास अनुभवात मोठा बदल घडत आहे.  

माझगाव डाॅक, स्वान डिफेन्सची नाैदल जहाजांसाठी भागीदारी

भारतीय नौदलासाठी लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक या जहाजांच्या डिझाइन आणि बांधणीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) आणि स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात टीमिंग ॲग्रिमेंटवर स्वाक्षरी करण्यात आली.  

कराराअंतर्गत एमडीएल  जहाज डिझाइन, प्रकल्प व्यवस्थापन व सिस्टम इंटिग्रेशनमधील अनुभवाचा उपयोग करील, तर स्वान त्यांच्या अत्याधुनिक व देशातील मोठ्या जहाजबांधणी सुविधांचा वापर बांधकामासाठी करील. दोन्ही शिपयार्ड्सच्या तांत्रिक, आर्थिक आणि कार्यकारी क्षमतांचा एकत्रित वापर करून भारतीय नौदलासाठी उत्कृष्ट व कार्यक्षम उपाय उपलब्ध करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. 

नवे पर्व ठरेल

ही भागीदारी भारतीय जहाजबांधणी क्षेत्रासाठी नवे पर्व ठरेल, असे मत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी व्यक्त केले.  

जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर याबाबत राज्य सरकारने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे, नव्या धोरणामुळे उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सरकार सर्व स्तरावर मदत करेल. यासाठी एक गट तयार करण्यात आला आहे- नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री  

English
हिंदी सारांश
Web Title : ₹78,000 Crore Deals for Port Modernization, Maritime Trade, and AI

Web Summary : Mumbai Port Authority signed 70 agreements worth ₹78,000 crore at India Maritime Week, focusing on port modernization, technology, and AI. Aiming for top 10 cruise destinations by 2047, investments will boost infrastructure and tourism. Mazagon Dock and Swan Defence partner for naval vessel construction.
टॅग्स :मुंबईनीतेश राणे