Mumbai polls behind poll poll; Call for voting by January 31 | स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे; 31 जानेवारीपर्यंत मतदान करण्याचं आवाहन 

स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे; 31 जानेवारीपर्यंत मतदान करण्याचं आवाहन 

मुंबई : सोशल मीडियावर अग्रेसर असलेले मुंबईकर स्वच्छता सर्वेक्षणाच्या (सन २०२०) व्होटिंगमध्ये मात्र अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात अव्वल ठरण्यासाठी अन्य शहरांतील नागरिक भरभरून मतदान करीत असताना मुंबईत व्होटिंगचे प्रमाण या वर्षीही खूप कमी आहे. जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटूनही एक कोटी २७ लाख लोकसंख्येपैकी जेमतेम एक टक्का लोकांनी मुंबईसाठी व्होट केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या या उदासीनतेचा परिणाम मुंबईच्या रँकिंगवर होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारमार्फत दरवर्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शहरांचे सर्वेक्षण केले जाते. गेल्या वर्षी महापालिकेचे रँकिंग घसरून ४९ क्रमांक आला होता. या स्पर्धेत मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराला इंदौर, नवी मुंबईने मागे काढले होते. मात्र मुंबईची रेटिंग घसरण्यामागे अन्य कारणांबरोबरच नागरिकांकडून मिळणाऱ्या मतांचे अत्यल्प प्रमाण हेदेखील प्रमुख कारण होते. या वर्षी अ‍ॅप, संकेतस्थळ अशा माध्यमांतून १ ते ३१ जानेवारी या कालावधीत व्होटिंग करण्याचे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.
मात्र १५ जानेवारीपर्यंत एक लाख ३० हजार ९२५ लोकांनी व्होट केले आहे. हे प्रमाण मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे. या स्पर्धेत मुंबईचे प्रतिस्पर्धी असलेल्या, परंतु तुलनेने फार कमी लोकसंख्या असलेल्या शहरांनी व्होटिंगमध्ये मुंबईला मागे टाकले आहे.
गेल्या वर्षी व्होटिंग श्रेणीत मुंबईला १२५० पैकी ८४८ गुण मिळाले होते. या वर्षी महापालिकेने पंचतारांकित रेटिंगसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे व्होटिंगचे प्रमाण वाढविण्याकरिता महाविद्यालय, सोसायट्या आणि झोपडपट्टी भागातही पालिकेचे अधिकारी जनजागृती करीत आहेत.

या स्पर्धेत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीत मुंबई, आग्रा, विशाखापट्टणम, कानपूर, गाजियाबाद, विजयवाडा अशी शहरे आहेत. यापैकी आग्रा आणि विशाखापट्टणममध्ये दहा टक्के मतदान झाले आहे. स्वच्छता हेल्पलाइन १९१६ किवा अ‍ॅप, संकेतस्थळ यावर नागरिक मुंबईसाठी व्होट करू शकतात. सार्वजनिक शौचालयाची अवस्था, सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी सफाई, कचरा वर्गीकरण आणि स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जागृती याआधारे व्होटिंग करावे लागते.

आग्रा
15,85,704
10.31%

विशाखापट्टनम
14,35,099
10.45%

मुंबई
1,27,82,429
1%

Web Title: Mumbai polls behind poll poll; Call for voting by January 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.