प्रभारी विभागप्रमुखांची यादी आली...! आता शिवडीतही शिंदे सेनेत नाराजीनाट्य

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 13, 2025 17:23 IST2025-09-13T17:23:29+5:302025-09-13T17:23:59+5:30

भाजपकडून ६ वर्षासाठी  निलंबित करण्यात आलेले नाना आंबोले यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे.

Mumbai Politics The list of in-charge department heads has come...! Now there is discontent in Eknath Shinde Shiv Sena even in Sewri | प्रभारी विभागप्रमुखांची यादी आली...! आता शिवडीतही शिंदे सेनेत नाराजीनाट्य

प्रभारी विभागप्रमुखांची यादी आली...! आता शिवडीतही शिंदे सेनेत नाराजीनाट्य

मनोहर कुंभेजकर

मुंबई-शिंदे सेनेने मुंबई शहर आणि उपनगरातील प्रभारी विभागप्रमुखांची यादी नुकतीच जाहिर केली. पश्चिम उपनगराबरोबर आता शहरात देखिल शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. या यादीत संधी न मिळाल्याने शिवडीत शिंदे सेनेचे ८० टक्के पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती नाराज पदाधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.

भाजपकडून ६ वर्षासाठी  निलंबित करण्यात आलेले नाना आंबोले यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. शिवडीतील शिंदे सेनेचे विधानसभाप्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, विधानसभा सहसंघटक, विधानसभा उप समन्वयक,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख आदी पुरुष व महिला पदाधिकारी राजिनामा देण्याच्या तयारीत आहे.

आम्ही सुरवाती पासून शिंदे सेनेत दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करून बाहेरून आलेल्या व्यक्तींना वरचढ पदे दिली जातात अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. 

एकीकडे उद्धव सेना आणि मनसे एकत्रित पालिका निवडणुका लढवण्याच्या तयारीत असताना आंबोले यांची निवड झाल्याने मित्रपक्षाकडून निवडणुकीत आपल्याला सहकार्य मिळणे अशक्य असल्याने, आम्ही पालिका निवडणूक लढायची तरी कशी? या मनःस्थितीत आम्ही असल्याचे नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात नाराजांशी एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क करत तुमच्या मनासारखे होईल, असे त्यांना आश्वासित केले आहे. मात्र नाराजांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोण आहेत नाना आंबोले

नाना आंबोले हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. २०१७ च्या निवडणुकीत पत्नीला उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याने आणि पक्ष विरोधी कारवाई केल्याने त्यांना १६ नोव्हेंबर २०२४ मध्ये भाजपाने ६ वर्षासाठी निलंबित केले. नंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

Web Title: Mumbai Politics The list of in-charge department heads has come...! Now there is discontent in Eknath Shinde Shiv Sena even in Sewri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.