Mumbai: कामचुकारपणाला थारा नाही! वर्षभर गैरहजर राहिलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:33 IST2026-02-06T14:31:59+5:302026-02-06T14:33:33+5:30
Mumbai Police: मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि कर्तव्यापासून मागे हटणाऱ्यांवर पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mumbai: कामचुकारपणाला थारा नाही! वर्षभर गैरहजर राहिलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई न करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन, गैरहजेरी, हलगर्जी, मारहाण, शिस्तभंग तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या आठ पोलिसांना निलंबित, तर दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दुसरीकडे, २३ पोलिसांचे निलंबन कायम ठेवले आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निलंबन आढावा समितीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस दलातील शिस्त, कार्यक्षमतेस तसेच जनतेच्या विश्वासाला धक्का देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ३० जानेवारीला झालेल्या त्रैमासिक निलंबन पुनर्विलोकन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संबंधितांविरोधातील प्रकरणांचे स्वरूप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने निलंबन पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय निलंबन आढावा समितीने घेतला. तर, वांद्रे वाहतूक विभागातील हवालदार शरद शिंदे आणि शंकर जठर यांचे निलंबन मागे घेताना शिस्तभंग कारवाईच्या अधीन राहून सेवेत परत घेतले आहे. त्यांची पुढील नेमणूक अपर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस दल, नायगाव येथे केली.
...यामुळे कारवाईचा बडगा
भांडुप पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र खरात ३१ डिसेंबर २०२४ पासून ३६५ दिवसांहून अधिक काळ गैरहजर असल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. मुलुंड पोलिस ठाण्याचे शंकरकुमार रूपनर हेदेखील दीर्घकाळ गैरहजर होते. तर, नारायण आळंद यांच्यावर चर्चगेट सबवे परिसरात बेकायदा फेरीवाल्यांवर संगनमताने कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
निलंबित, बडतर्फ पोलिस कोण?
सहायक पोलिस निरीक्षक नारायण आळंद (आझाद मैदान), पोलिस शिपाई रामेश्वर गुलनाड (ताडदेव), शिवाजी बलमे (वरळी), तुषार तिवूरवाडे (आग्रीपाडा), शंकरकुमार रूपनर (मुलुंड), रेखा बुरूड (नवघर), पोलिस हवालदार जितेंद्र खरात (भांडुप), पोलिस नाईक वसंत भुरा (विमानतळ) यांना निलंबित करण्यात आले. एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुनील देसाई आणि विक्रम शेंडगे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.