Join us

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:43 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला.

मुंबई-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला. राज ठाकरेंच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी याचे पडसाद पाहायला मिळाले. मुंबईतील चांदीवली येथे मनसेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावली. चांदीवली विधानसभा मतदार संघातील विभाग अध्यक्ष मेहेंद्र भानुशाली यांनी पक्ष कार्यालयावर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. चिरागनगर पोलिसांनी याबाबत भानुशाली यांना अगोदर समज दिली. पण त्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळे पोलिसांनी भानुशाली यांना ताब्यात घेतलं असून भोंगे देखील खाली उतरवले आहेत. तसंच लाऊड स्पीकर मशीन व इत्यादी सामानही जप्त केलं आहे. 

पोलिसांनी येऊन मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे काढले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असं राज ठाकरे म्हणाले होते. महेंद्र भानुशाली यांनी कार्यालयासमोरील झाडावर लावलेले भोंगे उतरवण्यात आले आहेत. भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. यावरुन आता राजकारण वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

महेंद्र भानुशाली काय म्हणाले?"मनसेचा कार्यकर्ता म्हणून राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून मी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली आहे. लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीच्या आरत्यांसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या वाजवल्या जाणार आहेत", असं भानुशाली म्हणाले. यामुळे तणाव कसा निर्माण होऊ शकेल? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्यानं तणाव निर्माण होतो का? नाही ना? मग हिंदू धर्माची आरती वाजवली तर तणाव का निर्माण होईल? ते त्यांच्या धर्माचं काम करत आहेत. आम्ही आमच्या धर्माचं काम करत आहोत, असंही भानुशाली म्हणाले.

टॅग्स :मनसेमनसे गुढीपाडवा मेळावाराज ठाकरे