India's Got Latent Case: महाराष्ट्र सायबर पोलीस इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे महाराष्ट्र सायबर पोलीस या शोच्या संपूर्ण भागांची चौकशी करत आहेत. अशातच अश्लील कमेंट प्रकरणी समय रैनाला जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये आई वडीलांविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. देशभरातून या याप्रकरणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे खार पोलीसही या प्रकरणाचा तपास करत असून या शोच्या संबधित लोकांचे जबाब घेत आहेत. दुसरीकडे समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र मुंबई पोलिसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. समय रैना सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तो १७ मार्चला मुंबईत परतणार आहे.
मुंबई पोलिसांनी रैनाच्या वकिलांना स्पष्टपणे सांगितले की, पोलिसांचा तपास इतका वेळ थांबू शकत नाही. त्यामुळे तपास सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत समयला पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये आशिष चंचलानी, अपूर्वा मखिजा आणि बलराज घई यांच्यासह तिघांचा समावेश आहे. बलराज घई हे ज्या स्टुडिओचे हा शो शूट करण्यात आला होता त्या स्टुडिओचे मालक आहेत. रणवीर अलाहाबादियाच्या टीमने तो आज त्याचा जबाब नोंदवण्यासाठी येऊ शकतो, असं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर पोलीस या शोच्या संपूर्ण १८ भागांची चौकशी करत आहेत. या १८ भागांमध्ये हजर झालेल्या कलाकारांमध्ये अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. या शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले जाणार आहेत. तसेच यामध्ये सहभागी होऊन अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.