मला वाचवा! एका कॉलवर पोलिसांची मांडवात धडक; मुंबईच्या नियंत्रण कक्षातील ‘नवदुर्गां’ची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:46 IST2025-09-27T06:46:18+5:302025-09-27T06:46:36+5:30
दररोज ५ हजार ते ५,५०० कॉल्स नियंत्रण कक्षात येतात. त्यात महिला, लहान मुले, अपघातग्रस्त, ज्येष्ठ नागरिक, अग्नितांडव, वाहतूक अडचणी अशा विविध प्रकारची मदत मागणारे असतात.

मला वाचवा! एका कॉलवर पोलिसांची मांडवात धडक; मुंबईच्या नियंत्रण कक्षातील ‘नवदुर्गां’ची कामगिरी
मनीषा म्हात्रे
मुंबई : मला वाचवा, माझे जबरदस्तीने लग्न लावत आहेत. एका अल्पवयीन मुलीचा हृदयद्रावक आवाज नियंत्रण कक्षात घुमला आणि अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांचे पथक थेट लग्नाच्या मांडवात दाखल झाले. योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे एका निष्पाप मुलीची बालविवाहातून सुटका झाली. ही घटना केवळ एक अपवाद नव्हे, तर नियंत्रण कक्षातील महिला कर्मचाऱ्यांच्या सततच्या सजगतेचे आणि संवेदनशीलतेचे द्योतक आहे. आमचे नाव कुठे झळकले नाही तरी चालेल; पण एखाद्याचा जीव वाचतो, हेच आमच्यासाठी खूप समाधान आहे, असे नियंत्रण कक्षातील नवदुर्गांचे म्हणणे आहे.
दररोज ५ हजार ते ५,५०० कॉल्स नियंत्रण कक्षात येतात. त्यात महिला, लहान मुले, अपघातग्रस्त, ज्येष्ठ नागरिक, अग्नितांडव, वाहतूक अडचणी अशा विविध प्रकारची मदत मागणारे असतात. या सर्वांना वेळेत मदत पोहोचविण्याचे आव्हान पोलिस कर्मचाऱ्यांवर असते. विशेष म्हणजे या कामात महिला पोलिस अतुलनीय कामगिरी बजावत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्ताने नियंत्रण कक्षात पडद्याआडून काम करणाऱ्या महिला पोलिसांच्या कार्याचा गौरव करणारा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे कौतुक केले. नियंत्रण कक्षातील महिला अंमलदार वैभवी लोखंडे सांगतात, प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाला जवळपास १७० ते २०० कॉल्स हाताळावे लागतात. प्रत्येक कॉलमध्ये कोणाच्या तरी आयुष्याचा निर्णायक क्षण असतो.
Voices You Never Hear, Faces You Never See.
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) September 22, 2025
Women in the Main Control Room give insight into what it’s like to be the calm in chaos. They ensure that every call, whether a complaint, concern, or suggestion received on helpline numbers 100/112/103, is addressed without delay. The… pic.twitter.com/bSjvZA4PGb
‘अनेकदा अपुरी माहिती’
महिला अंमलदार शालिनी देवरे यांचे म्हणणेही तसेच ठळक आहे. कॉल येताच आम्ही संबंधित पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधतो. अनेकवेळा माहिती अपुरी असते; पण आम्ही प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करत मदत पोहोचवतो.
‘अवघ्या ५ मिनिटांत सुटका’
अंमलदार किरण नारायणकर यांनी सांगितले की, लहान मुलीने रडत कॉल केला. तिचे जबरदस्तीने लग्न लावले जात असल्याचे सांगितले. वरिष्ठांना याबाबत सांगताच त्यांनी हालचाली सुरू केल्या. तिच्याकडून मिळालेल्या अपुऱ्या माहितीतून स्थानिक पोलिसांना सतर्क केले आणि ५ मिनिटांत पाेलिसांनी बालविवाह रोखला. या एकूण प्रकरणांचा आढावा घेता नियंत्रण कक्षातील महिला अंमलदार केवळ कॉल रिसीव्ह करत नाहीत, तर अनेकांचे आयुष्य वाचवत आहेत.