मुंबई :सोशल मीडियावरील पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावली किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे, लाइक करणारे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची नजर असते. असा गुन्हा करणाऱ्यांना भविष्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे नोकरी मिळण्यास बाधा येऊ शकते. त्याकरिता सोशल मीडियावर कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित २,६२२ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ७५२ गुन्ह्यांची उकल करत ६५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक पोस्ट संबंधित १२ गुन्हे नोंद असून, त्यामध्ये ६ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्यासह व्हायरल करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
'हे' शब्द आवर्जून टाळा
जे अपशब्द जातीवाचक उल्लेखाचे असतात, असे शब्द टाळावेत. ज्या शब्दांतून एकापेक्षा अधिक धार्मिक किंवा जातीच्या समूहात वितुष्ट निर्माण होऊन सलोखा बिघडण्याची शक्यता असते, असे शब्द टाळावेत.
येथे नोंदवा तक्रार...
अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअॅप किंवा अन्य समाजमाध्यमांवर पसरवू नयेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने जागरूक राहावे
नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सअॅप समूहात अफवा, चुकीची माहिती किंवा दोन समाजांत तेढ निर्माण होईल असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत पाठवू नये. त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समूहावर पोस्ट करणे टाळावे. अशाप्रकारचे साहित्य समूहात आल्यास डिलिट करावे, ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये.
याशिवाय एखाद्या समाजाचे किंवा धर्माविरोधातील साहित्य, पॉर्न साहित्य समूहावर पाठवू नये. ग्रुप अॅडमिनने वेळोवेळी समूहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे.
समूह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावेत आणि समूहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वतःकडे घ्यावा. समूहावरील आक्षेपार्ह मजकुराबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे.