Mumbai Crime: उत्तर मुंबईतील चारकोप येथून पोलिसांनी एका खाजगी बँकेतील महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल आणि खंडणीच्या प्रकरणात अटक केली आहे. महिलेवर तिच्या माजी सहकाऱ्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवून १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने कोर्टाकडे तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक केली.
पोलिसांनी बँकेच्या कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. डॉलीवर तिच्या आयटी व्यावसायिक सहकाऱ्याला चुकीच्या पद्धतीने तुरुंगात पाठवण्याचा, खोट्या बलात्काराच्या खटल्याचा कट रचण्याचा आणि त्याच्याकडून १ कोटी रुपये खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीला तुरुंगात पाठवून देखील आरोपी महिलेचे समाधान झाले नाही. डॉली कोटकने जामिनासाठी ना हरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात कोर्टाच्या आवारातच पीडितेच्या बहिणीकडून १ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यासोबतच, जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशीही धमकी डॉलीने दिल्याचे समोर आलं आहे.
वारंवार नकार देऊनही डॉली कोटक वारंवार फोन कॉलद्वारे पीडितेवर दबाव आणत राहिली. अखेर पीडित व्यक्तीने त्याच्या वकिलाच्या कार्यालयात एक बैठक घेतली होती जिथे डॉलीने पुन्हा १ कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी केली. डॉली एवढ्यावरच थांबली नाही. तिने बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आयटी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा बेकायदेशीरपणे वापरला. डॉलीने पीडितेच्या खात्याशी संबंधित मोबाइल नंबर गुगलवरुन काढून टाकला आणि त्याच्या जागी स्वतःचा मोबाइल नंबर दिला. ज्यामुळे डॉलीला ऑनलाइन बँकिंग तपशील, जीपीएस लोकेशन हिस्ट्री, वैयक्तिक फोटो आणि लोकेशन माहिती मिळू लागली.
मे २०२४ मध्ये, पीडित व्यक्तीला डॉली कोटकच्या नंबरवरून एक धमकीचा मेसेज आला ज्यामध्ये 'तू कधीही जिंकणार नाहीस आणि वेदनेने मरशील. पैसे दे नाहीतर तुरुंगात मरशील, असं लिहिलं होतं. डॉलीने पीडिताच्या कंपनीच्या एचआर विभागाला कथितपणे ईमेल केला, ज्यामुळे त्याची नोकरी गेली आणि प्रचंड दबावाखाली त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले गेले.
दरम्यान, वारंवार छळ झाल्यानंतर आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पीडितेने बोरिवली दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानंतर कोर्टाने चारकोप पोलिसांना भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १७५(३) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी डॉली अरविंद कोटक, बँकेची संबंधित कर्मचारी प्रमिला वास आणि सागर अरविंद कोटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.