मुंबई पोलीस... मला न्याय द्या, म्हणत व्यवस्थापकाने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:41 AM2019-07-24T02:41:49+5:302019-07-24T02:42:11+5:30

सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा : कॉर्पोरेट सेक्टरमध्ये रॅगिंगचा बळी; पवई पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai police ... give me justice, saying manager ended his life | मुंबई पोलीस... मला न्याय द्या, म्हणत व्यवस्थापकाने संपविले आयुष्य

मुंबई पोलीस... मला न्याय द्या, म्हणत व्यवस्थापकाने संपविले आयुष्य

Next

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कमी दिवसांतच चांगली प्रगती करणाºया, नेहमी कामात व्यस्त राहणाºया, तसेच व्यसन आणि मैत्रिणींपासूनही दूर राहत असलेल्या तरुणाला समलिंगी घोषित करत, त्याचा छळ करण्यात आला. या प्रकरणी एका नामांकित कॉर्पोरेट सेक्टरमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या या तरुणाने, ‘मुंबई पोलीस मला न्याय द्या’ म्हणत आयुष्य संपविले. महिनाभराने त्याची सुसाइड नोट वडिलांच्या हाती लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, पवई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत दिलीप पाटील (२५) असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा मूळचा जळगावचा रहिवासी होता. त्याचे वडील वरणगाव येथील लष्करी शस्त्र, दारूगोळा निर्माण कंपनीत कार्यरत आहेत. त्याने व्हीजेटीआयमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यातही तो टॉपर होता. तेथून जमनालाल बजाज इस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमधून त्याने एमबीए (माकेर्र्टिंग) केले. कॅम्पस मुलाखतीत त्याच्यासह काही जणांना जे. के. हेलन कर्टीस कंपनीने त्याला नोकरी मिळाली. वर्षभरापासून तो तेथे व्यवस्थापकीय पदावर रुजू झाला.

तीन महिन्यांपूर्वी कंपनीचे कार्यालय ठाणे येथून साकीविहारमध्ये शिफ्ट झाले. त्यामुळे तेथीलच गॅलेक्सी सृष्टी इमारतीत तो तीन मित्रांसोबत भाड्याने राहत होता. अनिकेत हुशार होता. तो आध्यात्मिक विचारांचा, तसेच शाकाहारी असल्याने मित्रांच्या दारू पार्ट्यांपासून नेहमीच दूर राहत होता. त्याला चहाचेही व्यसन नव्हते. सतत कामात व्यस्त असल्याने त्याला कोणी प्रेयसी अथवा मैत्रीण नव्हती. त्याचे सहकारी त्याला सतत टोमणे मारत. त्याला समलिंगी म्हणून चिडवत. या चिडवण्ययात वरिष्ठही पाठिंबा देत असल्याने त्याला काम करणे कठीण झाले होते.

आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी अनिकेतने घर गाठून आईवडिलांना सहकाऱ्यांकडून होत असलेल्या या मानसिक छळाबाबत सांगून नोकरी सोडणार असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनीही त्याला पाठिंबा देत, नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. लग्नाचा विषय निघताच पुढच्या वर्षी लग्न करण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती.

तेथून पुन्हा तो मुंबईत आल्यानंतर आईवडील फोनवरून त्याच्या संपर्कात होते. २६ जूनला कार्यालयातील ज्येष्ठ सहकाºयाने निवृत्तीनिमित्त पार्टी ठेवली होती. पार्टीनंतर अनिकेत साडेअकराच्या सुमारास घरी आला. रात्री आईने त्याला फोन करून चौकशी केली, तेव्हा रात्र खूप झाल्याने आई तू झोप. काळजी करू नकोस, मीही झोपतो, असे सांगून त्याने फोन ठेवला आणि तो त्याच्या खोलीत झोपी गेला. २७ तारखेला सकाळी आठच्या सुमारास आईने त्याला फोन करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या मित्रांकडे विचारणा केली. मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा तो मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला.

खोलीत सापडले भुलीचे इंजेक्शन
अनिकेतच्या रूममधून पोलिसांनी इंजेक्शन, तसेच भुलीच्या औषधांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याने यातूनच आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याचे व्हीसेरा पुढील तपासणीसाठी राखून ठेवला आहे. खोलीत सापडलेले औषधही न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविले असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.

सुटकेसमुळे झाला आत्महत्येचा उलगडा
आत्महत्येनंतर सुसाइड नोटची कोणीही विल्हेवाट लावू नये, म्हणून अरविंदने ती नोट सुटकेसमध्ये लपवून ठेवली. ती सुटकेस वडिलांनीच त्याला भेट म्हणून दिली होती. त्या सुटकेचा पासवर्ड फक्त त्यांनाच माहिती होता. अखेर मुलाच्या तेराव्यानंतर त्यांनी सुटकेस उघडली आणि त्याच्या आत्महत्येचा उलगडा झाला, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले.

आरोपींमध्ये वर्गमित्रही...
इंग्रजीतील तीनपानी चिठ्ठीत अनिकेतने आकाश वडेरा, दर्पण घोडके, झाकीर हुसेन, विकास अगरवाल, राजीव सोहनी, सचिन श्रीवास्तव या सहकाºयांची नावे नमूद केली आहेत. यातील आकाशने अनिकेतसोबत जमनालाल संस्थेत एकत्र शिक्षण घेतले आहे.

वरिष्ठांकडे तक्रार
अनिकेतने या छळाबाबत कंपनीच्या एचआर विभागाच्या व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे घटनेवरून समजते. त्यानंतर, त्याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढल्याचा आरोप वडिलांनी केला.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अनिकेतचे वडील दिलीप यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नेहमीच कामात त्याला दिलेले टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करत असे. तर, अन्य सहकारी नेहमीच मागे राहत. त्यामुळे तो त्यांच्या नजरेत आला. त्यात त्यांच्याकडून होत असलेल्या छळाला, रॅगिंगला कंटाळून त्याने आत्महत्या केली. त्याच्या सुटकेसमध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने सहकाºयांकडून कशाप्रकारे छळ होत होता, याचा उल्लेख केला आहे. शिवाय, त्यात ‘मुंबई पोलीस माझ्या आईवडिलांना मदत करून मला न्याय द्या,’ असे नमूद केले आहे. त्याच्यासारखे आणखी कोणी बळी जाऊ नये, म्हणून पोलिसांनी सखोल तपास करत दोषींवर कारवाई करावी, असेही पाटील यांनी सांगितले.

‘सहकाºयांकडून याआधी जीवे मारण्याचा प्रयत्न’
गोव्याला क्रुझवर झालेल्या पार्टीत त्याच्या सहकाºयांनी त्याला पाण्यात ढकलून देण्याचा प्लान केला होता. मात्र, तो वेळीच सतर्क झाला, शिवाय सहकारी सतत त्याच्या खोलीत डोकावत असल्याचेही त्याने वडिलांनी सांगितले.

Web Title: Mumbai police ... give me justice, saying manager ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.