Join us

रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:15 IST

Mumbai Police: राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाइक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ बाइक टॅक्सीविरुद्ध मंगळवारी आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाइक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ बाइक टॅक्सीविरुद्ध मंगळवारी आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.  आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्या तक्रारीवरून दोन्ही कंपन्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८ (३) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिवहन विभागाची परवानगी न घेताच ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ बाइक ॲपद्वारे बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार मोटार व्हेईकल ॲग्रिगेटर गाइडलाइन्स २०२० नुसार ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, कंपन्यांकडून तरतुदींचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. 

याचिका फेटाळलीरॅपिडो ॲपने रोपेन ट्रान्स्पोर्ट प्रा. लि. या नावाने आरटीए, पुणे यांना अर्ज केला होता. मात्र, आरटीए, पुणे यांनी २० डिसेंबर २०२२ च्या ठरावानुसार त्यांच्याकडे केलेला अर्ज रद्द केला. या ठरावाविरोधात ‘रोपेन’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही कंपनीला ॲप बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ‘रोपेन’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ती याचिकाही फेटाळली होती. कंपनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावली. तरीदेखील बाइक टॅक्सी सुरू असल्याचे उघडकीस आले.

अशी केली भाडेआकारणी परिवहन आयुक्तांनी १७ जूनला मुंबईत अवैधरीत्या चालू असलेल्या ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ मोटार बाइक सेवेविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, कार्यालयातील दोन लिपिकांनी या दोन्ही कंपन्यांच्या ॲपद्वारे बाइक बुक करण्याबाबत सांगितले. त्यानुसार, पहिल्या बुकिंगला ॲपद्वारे फोर्ट ते आझाद मैदान पोलिस ठाणे, अशी बाइक राइड बुक केली. यासाठी १७ रुपये भाडे आकारले. तर, दुसऱ्या बुकिंगला ३२ रुपये आकारले. कोणताही परवाना नसताना अशा प्रकारे सेवा पुरवत असल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत गुन्हा नोंदवला. 

टॅग्स :मुंबई पोलीसमहाराष्ट्रमुंबई