मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवाच्या बंदोबस्तापाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारसाठीही पोलिसांनी त्यांना परवानगी देण्यात आल्याचे समजते आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहे. तसेच पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहे.
मुंबईत हळूहळू मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी ७५० हून अधिक पोलिसांना राखीव ठेवले आहे. दुसरीकडे, मुंबईतील विविध ठिकाणचा फौजफाटा आझाद मैदानाच्या दिशेने वळविण्यात आला आहे. लालबागसह मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडील तैनात असलेले पोलिस बदलीवरील पोलिस न आल्याने दोन ते तीन दिवसांपासून सलग कर्तव्य बजावत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.
रेल्वे स्थानकातही अतिरिक्त फौजफाटा
सीएसएमटीसह आझाद मैदान, मंत्रालय तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेल्वेस्थानकातही अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश
पोलिसांनी सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहे. मराठा आरक्षणाचे एकूण स्वरूप आणि आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस ठेवणे गरजेचे असून, त्याच धर्तीवर हा आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेतील पोलिसांचाही सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.