Join us  

मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्वीटवरून साधला मुंबईकरांशी संवाद; कोरोनाबाबत प्रश्नांना दिली उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:13 AM

मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हण्डलर्सवरून कोरोना संदर्भात जनजागृती सुरु आहे.

मुंबई : कोरोना संदर्भात रस्त्यावर उतरून जनजागृती करण्याबरोबरच मंगळवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टिष्ट्वटरद्वारे संवाद साधत मुंबईकराना घरी रहा सुरक्षित रहाचे आवाहन केले. यावेळी कोरोना संदर्भातील संभ्रम, भिती, अफवा, अडचणी तसेच काळजीच्या प्रश्नांमध्ये हा संवाद रंगला होता.

मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हण्डलर्सवरून कोरोना संदर्भात जनजागृती सुरु आहे. सीसीटिव्ही तसेच ड्रोनद्वारे मुंबई पोलीस गर्दीची ठिकाणे हेरुन नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे. त्यातच मुंबई पोलीस आॅन ड्युटी २४ तास कार्यरत राहून बंदोबस्तासाठी तैनात असताना, आयुक्तही रस्त्यावर उतरले. महत्त्वाच्या ठिकाणे गाठून ते नागरिकांना काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शन करत आहे.गेल्या काही दिवसांत आयुक्तांच्या नावाने तीन ध्वनिफीत व्हायरल झाल्या. या खोट्या असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ट्वीटरवरून त्यांनी नागरिकांशी संवाद वाढवलेला पहावयास मिळत आहे.

मंगळवारी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान आयुक्तांनी ट्विटरवरून तासाभरात २० हुन अधिक जणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यात पेट्रोल मिळत नाही, वृद्ध आई आजारी असून तिला भेटणयासाठी परवानगीची मागणी बरोबरच विविध अफवा तसेच अफवाबाबत खातरजमा कशी करायचे याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यात लॉकडाउनच्या काळात बाहेर जाणे शक्य नसल्याने पर्यायी शेजारच्या किंवा पोलिसांच्या मदतीने आईची काळजी घेण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला आहे.

तर अनेकांनी आपल्या अडचणीबाबत सांगताना, भावेश कपाडिया यांनी, मी डॉक्टर असून अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना डॉक्टर आयडी असताना देखील अन्य ओळखपत्राची मागणी होत असल्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी डॉक्टर आयडी पुरेसा असल्याचे सांगून गरज पडल्यास १०० क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले.तर बोरीवलीतील जयसी परिहार यांनी, आम्ही वृद्ध दाम्पत्य असून इमारतीलगत भाजी विक्रेते नसल्याने ग़ैरसोय होत असल्याचे नमूद करताच त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांसाठी केले योग्य नियोजन

फ्रांसिस जोसेफ यांनी पोलिसांची काळजी कशी घेतली जात आहेत? याबाबत विचारताच आयुक्तांनी त्यांना पोलिसांबाबत विचार केला म्हणून धन्यवाद देत पोलिसांसाठी योग्य असे नियोजन करण्यात आले असल्याचे नमूद केले. आणि संवादाबाबत सर्व मुंबई करांचे आभार मानत, लवकरच भेटू सांगत सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस