विवाहानंतर पत्नीला मोबाइल फोन भेट देणाऱ्या पतीला थेट कारागृहाचा रस्ता धरावा लागला. कारण तिचा पती इसमउबेद हैदरअली खान हा सराईत गुन्हेगार असून तो बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या मागावर असणाऱ्या अंधेरी पोलिसांनी 'गुगल'च्या मदतीने उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथून त्याला अटक केली.
अंधेरीच्या सकीनाबाई चाळीतील तीन घरांमध्ये खान याने १३ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान एकूण ८ लाख रुपयांची घरफोडी करुन पळ काढला होता. या प्रकरणी अँजेलो डिसोजा यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारे घरफोडी करणारा आरोपी खान असल्याची पोलिसांनी ओळख पटवली. खान मोबाइल वापरत नसल्याने त्याच्या शोधात अडचण येत होती. त्याच्या लोकेशनची माहिती मिळावी, यासाठी पोलिसांनी गुगलचा पत्र लिहिले होते.
ई-मेल आयडीमुळे अलर्टखानने नुकतेच लग्न केले होते. त्याच्या पत्नीला त्याने एक मोबाइल भेट दिला. तो सुरू करण्यासाठी त्याने स्वत:च्या ई-मेल आयडीवरुन लॉगिन केले. त्याच्या अलर्ट गुगलने पोलिसांना दिला. त्याचे लोकेशन समजताच पोलिसांनी शहाजानपूरमधून त्याचा गाशा गुंडाळला.
विविध पोलिसांत गुन्हेखानविरोधात शिवाजी पार्क, माहीम, कुर्ला, आर.ए.के. पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे अधिकाऱ्यांना समजले. घरफोडी केल्याच्या दोन दिवसांनंतर तो बिहारच्या दरभंगा परिसरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाराणसीच्या चांदोली रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या हातून निसटला. १० ते ११ महिन्यांपासून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार असा स्वत:चा ठिकाणा बदलणाऱ्या खानच्या मागावर अंधेरी पोलीस होते.