Mumbai is not at risk of hurricanes; Comfort due to geographical situation | मुंबईला चक्रीवादळांचा धोका नाही; भौगोलिक परिस्थितीमुळे दिलासा

मुंबईला चक्रीवादळांचा धोका नाही; भौगोलिक परिस्थितीमुळे दिलासा

- सचिन लुंगसे 

मुंबई : अरबी समुद्रात नुकत्याच उठलेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ या दोन चक्रीवादळांनी मुंबईकरांना धडकीच भरवली. सुदैवाने आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ही दोन्ही चक्रीवादळे मुंबईपासून दूर जात ओमानसह गुजरातच्या दिशेने पुढे सरकली. मात्र १६१८ ते १९९८ या सालादरम्यान अरबी समुद्रात उठलेल्या आणि मुंबईजवळून वाहिलेल्या चक्रीवादळांनी तब्बल ३ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर याव्यतिरिक्त याच काळात निर्माण झालेल्या आणि देशाच्या पश्चिम किनारी धडकलेल्या चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्य आणि वित्तहानी झाल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाकडे आहे.

यंदा अरबी समुद्रात मान्सून हंगामात ‘वायू’ आणि ‘हिक्का’ अशी दोन वादळे निर्माण झाली. मान्सूननंतरच्या हंगामात ‘क्यार’ आणि ‘महा’ ही दोन वादळे आली. पूर्व मान्सून हंगामात मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले नाही. बंगालच्या उपसागरात वर्षाच्या सुरुवातीस ‘पाबूक’, पूर्व मान्सून हंगामातील ‘फोनी’ आणि मान्सूननंतरच्या मोसमात ‘बुलबुल’ ही चक्रीवादळे आली. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त हवामानविषयक घडामोडी घडतात. मान्सूननंतरच्या हंगामात बंगालच्या उपसागरात घडामोडी जास्त असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती जास्त होते. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली बहुतांशी वादळे पश्चिम बंगाल, ओडिशाकडे सरकतात. मात्र मान्सूनचा पॅटर्न बदलत असल्याने बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली चक्रीवादळे काही वर्षांपासून दक्षिण भारताच्या किनारी धडकत आहेत. अरबी समुद्रात निर्माण होत असलेली चक्रीवादळे मात्र ओमानच्या दिशेने सरकत असून, भौगोलिक परिस्थितीमुळे ही वादळे मुंबईकडे सरकत नाहीत.
- किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ

कोणत्या साली, कुठे उठले, कोणते चक्रीवादळ?
२०१९
२६ एप्रिल ते ४ मे - हिंद महासागरासह बंगालच्या उपसागरात फनी चक्रीवादळ उठले.
१० ते १७ जून - अरबी समुद्रात वायू वादळाची निर्मिती झाली.
२२ ते २५ सप्टेंबर - अरबी समुद्रात हिक्का नावाचे वादळ उठले.
२०१८
१६ ते २१ मे - अरबी समुद्रात सागर चक्रीवादळ उठले.
६ ते १४ आॅक्टोबर - अरबी समुद्रात लुबान नावाचे चक्रीवादळ उठले.
८ ते १३ आॅक्टोबर - बंगालच्या उपसागरात तितली नावाचे चक्रीवादळ उठले.
१० ते १९ नोव्हेंबर - बंगालच्या उपसागरात गज चक्रीवादळाची निर्मिती झाली.
१३ ते १८ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात पेथाई नावाचे चक्रीवादळ उठले.
२०१७
१५ ते १७ एप्रिल - बंगालच्या उपसागरात मारुथा चक्रीवादळ आले.
२८ ते ३१ मे - बंगालच्या उपसागरात मोरा नावाचे चक्रीवादळ आले.
२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात ओखी नावाचे चक्रीवादळ आले.
२०१६
१७ ते २२ मे - बंगालच्या उपसागरात रोणू नावाचे चक्रीवादळ आले.
२१ ते २८ आॅक्टोबर - बंगालच्या उपसागरात कयांत चक्रीवादळ आले.
२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात नाडा चक्रीवादळ आले.
६ ते १३ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात वरद नावाचे चक्रीवादळ आले.
२०१५
७ ते १२ जून - अरबी समुद्रात अशोबा नावाचे वादळ उठले.
२६ जुलै ते २ आॅगस्ट - बंगालच्या उपसागरात कोमेन चक्रीवादळ उठले.
२८ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर - अरबी समुद्रात चपला चक्रीवादळ उठले.
५ ते १० नोव्हेंबर - अरबी समुद्रात मेघ नावाचे चक्रीवादळ उठले.
२०१४
१० ते १४ जून - ननावूक चक्रीवादळे उठले.
७ ते १४ आॅक्टोबर - हुडहुड नावाचे चक्रीवादळ उठले.
२५ ते ३१ आॅक्टोबर - निलोफर नावाचे चक्रीवादळ उठले.
२०१३
१० ते १६ मे - वियारू चक्रीवादळ उठले.
८ ते १४ आॅक्टोबर - पहिलीन चक्रीवादळ उठले.
१९ ते २३ नोव्हेंबर - हेलेन
२३ ते २८ नोव्हेंबर - लेहेर
६ ते १३ डिसेंबर - मादी नावाचे चक्रीवादळ उठले.
२०१२
२३ ते २६ आॅक्टोबर - मुराजन
२८ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर - नीलम
२०११
२९ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर - कैला
२५ ते ३१ डिसेंबर - थाने नावाचे चक्रीवादळ उठले.

मुंबई आणि वादळे
१६ मे १६१८ रोजी मुंबईच्या किनारी वाहिलेल्या चक्रीवादळामुळे २ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
१८५४ साली ३० आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईच्या किनारी वाहिलेल्या चक्रीवादळामुळे १ हजार नागरिकांचा जीव गेला.
१९४८ साली १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईच्या किनारपट्टीहून वाहिलेल्या चक्रीवादळामुळे मोठी वित्तहानी झाली होती.

पाच वर्षांत चक्रीवादळांची निर्मिती होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले
गेल्या पाच वर्षांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे म्हणणे आहे. उत्तर हिंद महासागरातील तीव्र चक्रीवादळाची वारंवारता (म्हणजेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र) गेल्या दशकांमध्ये तीन पटीने वाढली आहे. मागील दशकांच्या तुलनेत मे, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात सुमारे एक तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता होती. आता ही संख्या दरवर्षी सुमारे तीनवर गेली आहे.

बंगालच्या उपसागरात या वर्षी अत्यंत तीव्र असे ‘फोनी’ चक्रीवादळ निर्माण झाले, तर अरबी समुद्रामध्ये तीव्रता वाढल्यानंतर चक्रीवादळ ‘वायू’ काही प्रमाणात पश्चिम किनारी सरकले. भारताला सुमारे आठ हजार किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. ज्यापैकी चार हजार किलोमीटर मुख्य भूभागाच्या बाजूने आहे. सर्वसाधारण असा अंदाज वर्तविला जात आहे की, भविष्यात भारताच्या सुमारे ७६ टक्के किनारपट्ट्या चक्रीवादळांना आणि त्सुनामीला बळी पडतील. चक्रीवादळांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, १८९१-
२००० सालाच्या कालावधीत जवळपास ३०८ उष्णकटिबंधीय चक्रीवादळांनी पूर्व किनारपट्टी ओलांडली. त्यातील १०३ तीव्र होती. पश्चिम किनारपट्टी ओलांडलेल्या ४८ चक्रीवादळांपैकी २४ चक्रीवादळे तीव्र होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbai is not at risk of hurricanes; Comfort due to geographical situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.