Join us  

"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 8:51 AM

राजकारण वाईट हे सांगणारे महाभागही मला भेटले. राजकारणातूनही चांगले काम करता येते, जनतेच्या अडचणीत त्यांच्या मदतीला धावू शकता. त्या भावनेतून मी राजकारणात आलो असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - मी अजून प्रचाराला सुरुवात केली नाही. पण काही व्यक्तींनी समाजमाध्यमांवर टीका करायला सुरुवात केली. फौजदारी क्षेत्रात वकिली करताना अनेक गुन्हेगारांना फासावर पाठवलं आहे. गुन्हेगारांकडून अनेक आरोप व्हायचे. परंतु अशा आरोपांना मी उत्तर दिले नाही. तसेच राजकारणात एकाने टीका केली म्हणून दुसऱ्याने उत्तर द्यायचे हा माझा उद्योग नाही. मला सकारात्मक कामे करायची आहे. या मतदारसंघातील जटील प्रश्न कसे सोडवता येतील, राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून देशाची स्थिरता कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहाय्य करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना टोला लगावला. 

वांद्रे येथील सभेत उज्ज्वल निकम म्हणाले की, भाजपाचे मुंबई अध्यक्ष हे वयाने लहान असले तरी राजकारणातील अनुभव खूप मोठे आहेत. राजकारणात मला भाषणाची सवय नाही. पण काहीही चुकले तरी ती चूक दाखवून दिली तर मी दुरुस्त करेन. विरोधकांनी माझ्यावर टीका करावी पण अकारण मला छेडण्याचा प्रयत्न करू नये. मला कठोर भाषा वापरता येते. ज्यांनी माझा युक्तिवाद ऐकला असेल त्यांना ते माहिती असावी. आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी सेवक आहे तसेच मी या मतदारसंघाचा सेवक राहीन, अडीअडचणीत माझा फोन नंबर सगळ्यांना दिलेला आहे. राजकारण वाईट हे सांगणारे महाभागही मला भेटले. राजकारणातूनही चांगले काम करता येते, जनतेच्या अडचणीत त्यांच्या मदतीला धावू शकता. त्या भावनेतून मी राजकारणात आलो असं त्यांनी सांगितले. 

तसेच जातीय सलोखा टिकला पाहिजे, धार्मिक वाद होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा कटाक्ष होता. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळात ७ दलित आणि ४ इतर असतील असं त्यात तरतूद आहे. आपल्याला समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जायचं आहे. ही घटना बदलली जाणार आहे असा काही प्रचार करतात पण घटना कधीही बदलली जाणार नाही. काहीवेळा बोगस प्रचार केला जातो. भीतीचा बागुलबुवा निर्माण केला जातो असंही विरोधकांच्या टीकेला निकम यांनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, भारताची राज्यघटना ही जगात सर्वोत्तम आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायनिवाडे उदाहरण म्हणून आम्हीही वापरतो असं कौतुक पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलनं केले होते. त्यामुळे भारताची घटना बदलणार ही चुकीचा भ्रम मनातून काढून टाका. माझं राजकीय भाषण नाही, जे बोलतो ते हृदयापासून बोलतो. न्यायालयातील उज्ज्वल निकम तुम्ही पाहिले असतील परंतु तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून हा उज्ज्वल निकम संसदेत तितक्याच तत्परतेने काम करेल अशी खात्री देतो असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :मुंबई उत्तर मध्यउज्ज्वल निकममहायुतीलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४