Join us  

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची राम कदमांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 3:17 PM

भाजपा आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात बुधवारी (5 सप्टेंबर) मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

मुंबई - भाजपा आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात बुधवारी (5 सप्टेंबर) मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्या वतीने भाजपा आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. भाजपा आमदार ‘रावण’ कदम यांच्या फोटोला काळं फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनामध्ये आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह असंख्य महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. 

(भाजपानं 'बेटी भगाओ' कार्यक्रम सुरू केलाय का ?- उद्धव ठाकरे यांचा सवाल)

काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहीहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

(मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान)

राम कदमांनी खेद व्यक्त केला

दरम्यान, लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे. 

 

टॅग्स :राम कदमराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा