Join us

मुंबई महापालिकेची खास सेवा; शनिवारी, रविवारीही विवाह नोंदणी शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:20 IST

मुंबईतील नवविवाहितांना मोठा दिलासा; यापुढे नोंदणीच्याच दिवशीच मिळणार प्रमाणपत्र

मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा आता मुंबईकरांसाठी शनिवार व रविवारही उपलब्ध असणार आहे. या दिवशी पालिकेने खास वीकेण्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याच दिवशी विवाह प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असून, वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, पालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते.

कोणत्या दिवशी कोणता विभाग ?

दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम, एस या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल.

दर रविवारी बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व, टी या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा उपलब्ध नसणार

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकेण्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे.

या सेवा शनिवारी, रविवारी 3 सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. जलद विवाह नोंदणी सेवेत प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील.

नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५०० इतकी रक्कम आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :लग्नपती- जोडीदारमुंबई महानगरपालिका