मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:23 IST2025-10-07T06:22:53+5:302025-10-07T06:23:01+5:30
मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रारूप आराखडा जाहीर करून नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या होत्या.

मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी अंतिम मंजुरीनंतर ३०८ हरकती-सूचनांनुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेवर एकूण ४९४ हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. प्रभागरचनेवर प्राप्त ६० टक्के सूचना हरकती स्वीकारल्यानंतर याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत २२७ वॉर्ड असून, ती संख्या तशीच असणार आहे. त्यामुळे आता आरक्षण सोडत आणि मतदार याद्या याची प्रतीक्षा आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जानेवारीच्या मध्यावर निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रारूप आराखडा जाहीर करून नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या होत्या. यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. यात पालिकेकडे ४९४ हरकती-सूचना दाखल झाल्या होत्या. यावरील सुनावणीनंतर सोमवारी प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून, राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर ती जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, वॉर्डची सीमा बदलली, मतदान केंद्र बदलले, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे अंतिम ३०८ हरकती, सूचनांवर सुनावणी घेऊन प्रभागरचना अंतिम करण्यात आली. सहा प्रभागांच्या रचनेत बदल झाले आहेत. त्यापैकी चार प्रभाग हे पश्चिम उपनगरातील, तर दोन प्रभाग पूर्व उपनगरातील आहेत. नव्या प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या जागांचे संतुलन साधून हे बदल झाले आहेत.
काेणत्या सूत्रानुसार
केली प्रभागरचना निश्चित?
मुंबईमध्ये एका प्रभागासाठी किमान ५४,८१२ लोकसंख्या असणे गरजेचे आहे. यामध्ये १० टक्के जास्त आणि १० टक्के कमी लोकसंख्येनुसार प्रभाग निश्चित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. यानुसार लोकसंख्येत जास्तीत जास्त ६०,९९२, तर कमीत कमी ५९,३०१ असे बदल करता येतात. प्रभागरचना निश्चित करताना या लाेकसंखा सूत्राचा आधार घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.