मुंबई - टँकर चालकांच्या मागण्या व बंदवर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.
मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना शुक्रवारी केली. तसेच भू-नीर प्रणाली सोप्या करण्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शुक्रवारी निर्देश दिले होते. विहीर, कूपनलिका तसेच भू-जल उपशासाठी आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त करणे बंधनकारक राहणार आहे.
टँकर बंदचा फटका टँकर बंदचा फटका दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या बांधकामांना बसला. दोन हजार ठिकाणच्या बांधकामांपैकी काही ठिकाणी पाण्याअभावी काम बंद पडल्याची माहिती बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले.
केवळ स्थगिती न देता जाचक अटी रद्द कराव्यात. बंद सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारच्या अटीप्रमाणे आम्ही एनओसी घेऊ. मात्र, मुंबईतील कोणत्याही टँकर मालकाकडे २०० चौरस मीटर मालकीची जागा नाही. शिवाय हे नियम मुंबईलाच का लागू आहेत? जाचक अटींमुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.- अमोल मांढरे, प्रवक्ता, मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशन