मालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 01:13 AM2020-02-27T01:13:41+5:302020-02-27T07:04:36+5:30

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने कसली कंबर

mumbai municipal corporation will seize household items if one fails to pay Property tax kkg | मालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा

मालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा

Next

मुंबई : आर्थिक वर्ष संपत आले, तरी मालमत्ता कराचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये थकले आहेत. यामुळे पालिकेने आता शेवटच्या महिन्याभरात ही थकबाकी वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, आता महापालिका थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करणार आहे.

या कारवाईची सुरुवात विलेपार्ले येथील विमान कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त करून केली आहे. त्यामुळे अशी कारवाई टाळण्यासाठी मुंबईकरांनी तत्काळ मालमत्ता कराची थकबाकी भरावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

जकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. मात्र, सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आतापर्यंत मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ तीन हजार १५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडित करणे, मालमत्तेची अटकावणी, जप्ती करणे यांसारखी कारवाई करण्यात येत होती. मात्र, यंदा मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात झाल्याने, या कर वसुलीसाठी विविध स्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत संबंधित थकबाकीदारांशी संवाद साधणे, जनजागृती करण्यात येत आहेत.

मात्र, असे करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०५ व २०६चा वापर करून थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र, ही कारवाई करताना स्त्री-धन, जडजवाहीर, दागिने यांसारख्या वस्तू या कारवाईतून वगळण्यात येणार आहेत. मात्र, पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने दररोज किमान ८० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, थकबाकीदारांना हुडकून जप्तीची कारवाई सुरू आहे.

या वस्तू करणार जप्त
महापालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करणार आहे. यात दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा आदी वस्तुंचा समावेश आहे.
portal.mcgm.gov.in या संकेतस्थळासह 'MyBMC 24x7' या अँड्रॉइड अ‍ॅपद्वारेही आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
मेस्को एअरलाइन्स या विमान कंपनीवर जप्तीची कारवाई पालिकेने मंगळवारी केली. या कंपनीने एक कोटी ६४ लाख ८३ हजार ६५८ रुपये मालमत्ता कर थकविला आहे.

Web Title: mumbai municipal corporation will seize household items if one fails to pay Property tax kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.