मुंबईत किती मांजरी, मुंबई महापालिका कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचीही करणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:06 IST2025-04-15T16:06:38+5:302025-04-15T16:06:45+5:30

कुत्र्यांप्रमाणे पालिका आता मांजरींचाही सर्वेक्षण अहवाल सादर करेल.

Mumbai Municipal Corporation will now count stray cats just like dogs | मुंबईत किती मांजरी, मुंबई महापालिका कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचीही करणार गणना

मुंबईत किती मांजरी, मुंबई महापालिका कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचीही करणार गणना

मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरींचा त्रासही दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचेही नियमित सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात १० वॉर्डांमध्ये अवघ्या ३२५ भटक्या मांजरी आढळल्या आहेत. त्यात मालाडच्या २२ किमी परिसरात सर्वाधिक ६५ भटक्या मांजरींची नोंद झाली आहे.

भटक्या मांजरींच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी मांजरींची नेमकी संख्या किती आणि त्यांची संख्या नियंत्रणात आहे की नाही, याची योग्य आकडेवारी महापालिकेकडे सध्या उपलब्ध नाही.

२०१९ पासून मांजरांची निर्बीजीकरण मोहीम

प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या नोंदीनुसार सँडहर्स्ट रोड, मशीद रोड आणि मालाड, प्रभादेवी, महालक्ष्मी या भागात सर्वाधिक भटक्या मांजरी आढळल्या आहेत. कुत्र्यांप्रमाणे मांजरांच्या संख्येवरही नियंत्रण असावे, यासाठी २०१९ पासून महापालिकेने निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली. 
ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या सहकार्याने राबवलेल्या या मोहिमेत आतापर्यंत साडेसहा हजारांपेक्षा जास्त मांजरांचे निर्बीजीकरण झाले आहे. त्यातही इमारती, झोपड्यांच्या अंतर्गत भागात या मांजरी आढळत असल्याने गणना व निर्बीजीकरण करणे आव्हानात्मक ठरते आहे.

सर्वेक्षण केले कसे? 

ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया संस्थेकडून एका ट्रॅकिंग ॲपद्वारे पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये भटक्या मांजरांचे छायाचित्र काढून तो नर आहे की मादी, त्याचे निर्बिजीकरण झाले आहे का आदी माहिती भरण्यात आली. असेच भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण झाले आहे.

मांजर सर्वेक्षणातील  तपशील आहे असा...

मुंबईतील २४ वॉर्डांपैकी बी, डी, जी दक्षिण, एच पश्चिम, के पश्चिम, एल, एन, पी उत्तर, आर उत्तर, एस अशा दहा वॉर्डांमधील काही किमी परिसरातील भटक्या मांजरांचे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण.

मशीद रोड, सँडहर्स्ट रोडचा समावेश असलेल्या बी वॉर्डमध्ये आठ किमीच्या परिसरात ४१ भटक्या मांजरांची नोंद.

पी उत्तर म्हणजेच मालाड परिसरात २२ किमीच्या परिसरात सर्वाधिक ६५ भटक्या मांजरी.

एल वॉर्डमधील (कुर्ला) २६ किमीच्या परिसरात ५३ मांजरी.

जी दक्षिण या प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी परिसरातील १४ किमी परिसरात ३८ मांजरींची नोंद.
 

Web Title: Mumbai Municipal Corporation will now count stray cats just like dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.