Join us
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेचा यंदाच्या वर्षी ३,९४८ घरांचा ‘आश्रय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:33 IST

मेहनती हातांना अखेर सुरक्षित निवाऱ्याची हमी; पुनर्विकास प्रकल्पांना गती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या वर्षाअखेर म्हणजेच डिसेंबर २०२६ पर्यंत सफाई कामगारांना तब्बल ३,९४८ घरे उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे.

संपूर्ण शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना कामाचे विशिष्ट स्वरूप व तेथील वातावरणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच त्यांच्यात मृत्यूदराचेही प्रमाण अधिक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रानजीक कर्मचारी निवासस्थानाच्या रूपात उत्तम निवास व्यवस्था पुरवणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने आश्रय योजनेंतर्गत सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत २७ हजार ९९२ कामगार कार्यरत आहेत. आश्रय योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांच्या ४६ पैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यात, ‘ए’ विभागातील कोचिन स्ट्रीट, आर/दक्षिण विभागातील पॉवेल्स लँड व ‘ई’ विभागातील सिद्धार्थनगर या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले असून, त्या सफाई कामगारांना हस्तांतरित केल्या आहेत. पुढील वसाहतींचे काम टप्प्याटप्प्यात सुरू आहे.

१४ वसाहतींची कामे पूर्णत्वाकडे

विभाग     वसाहत    तारीख    घरे

  • ए     राजवाडकर स्ट्रीट    एप्रिल २०२६    १४०    
  • एफ उत्तर    राळी कॅम्प सरदार नगर     जून २०२६    ११२     
  • एफ उत्तर     राळी कॅम्प ट्रान्झिट     जून २०२६    १६०      
  • एफ उत्तर    कालपाक     जून २०२६    १४८      
  • के पश्चिम    यश रोड     जुलै २०२६     २७६    
  • के पश्चिम    ए. बी. नायर रोड     जुलै २०२६    १६१     
  • पी दक्षिण    मित्रा नगर    मे २०२६    ४५५     
  • आर दक्षिण    अटुस्ती रोड     एप्रिल २०२६    २०४     
  • आर मध्य    बाभाई नाका     एप्रिल २०२६    ५५      
  • एन    चितळेनगर     जून २०२६     ११५     
  • ई     एन. एम. जोशी मार्ग     सप्टेंबर २०२६    ८२      
  • पी दक्षिण    प्रतापेटी नगर     सप्टेंबर २०२६     ८२१     
  • पी दक्षिण     जे. पी. नगर     ऑक्टोबर २०२६     २२०     
  • एम पश्चिम    वडारवाडी     ऑक्टोबर २०२६    १८४

‘४ ठिकाणी कामे थांबविली’

पालिकेतील सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांची १२ हजार घरे बांधली जाणार आहे. दोन टप्प्यात ही घरे बांधण्यात येणार असून, यासाठी १,१२० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आश्रय योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून २०२८ पर्यंत सर्व घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी १४ ठिकाणच्या वसाहतींचे काम यंदाच्या वर्षी पूर्ण होणार असून, सफाई कामगारांना ही घरे उपलब्ध होतील. मात्र, अन्य ४ ठिकाणी काही तांत्रिक कारणास्तव काम थांबवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Corporation to Provide 3,948 Homes for Sanitation Workers

Web Summary : Mumbai Municipality will provide 3,948 houses to sanitation workers by December 2026 under the 'Ashray' scheme. The initiative aims to improve living conditions, addressing health issues faced by workers. Redevelopment of 30 colonies is underway, with 14 nearing completion. The project faces some technical delays.
टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबई महानगरपालिका