मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 06:52 IST2025-10-13T06:52:00+5:302025-10-13T06:52:14+5:30
चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार असून, आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
मुंबई : महापालिकेच्या आगामी आरक्षण निवडणुकीसाठी प्रभाग कार्यप्रणालीबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना जारी झाली आहे. ९ ऑक्टोबरला जाहीर केल्याप्रमाणे चक्राकार पद्धतीने सोडत काढण्यात येईल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार असून, आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
बदललेल्या राजकीय समीकरणानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत चक्राकार आरक्षण निघत असताना यापूर्वी ते उतरत्या क्रमानुसार देण्यात आले होते. एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या किती आहे, ते पाहून त्याचे एकूण लोकसंख्येशी गुणोत्तर काढून हे आरक्षण ठरते. चक्राकार पद्धती लागू केल्यामुळे सध्याचे अनेक आरक्षित प्रभाग बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय गणित नव्याने मांडले जाण्याची शक्यता आहे. काही माजी नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे, तर काहींना पुन्हा नव्या संधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोणते प्रभाग आरक्षित होण्याची शक्यता ?
मुंबईची एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ आहे, तर अनुसूचित जातींची संख्या ८ लाख ३ हजार २३६ आहे. अनुसूचित जमातींची संख्या १ लाख २९ हजार ६५२ इतकी आहे, तर प्रत्येक प्रभागात सरासरी लोकसंख्या ५४ हजार ८५४ आहे.
त्यामुळे चक्राकार आरक्षणामुळे कोणते वॉर्ड आरक्षित होणार, याच्यावर चर्चा सुरू झाली असून, एकीकडे अनुसूचित जातींसाठी ९३, ११८, १३३, १४०, १४१, १४६, १४७, १५१, १५२, १५५, १८३, १८६, १८९, १९९, २१५ हे वॉर्ड आरक्षित होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे अनुसूचित जमातींसाठी ५९, १२१ हे प्रभाग आरक्षित होण्याची शक्यता आहे.