महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:08 IST2025-10-22T12:07:23+5:302025-10-22T12:08:08+5:30
पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी अपेक्षित

महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका वांद्रा येथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार आहे. हे नवीन महाविद्यालय भाभा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारित कार्यरत असणार आहे. वांद्रे पश्चिम येथील आरके पाटकर मार्ग, येथील जुन्या ‘बीपी ऑफिस’चा भूखंड या प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.
नर्सिंग महाविद्यालयासाठीच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ २२३६ चौरस मीटर आहे. या मोक्याच्या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय, संलग्न वसतिगृह आणि डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली जाणार आहेत. हे महाविद्यालय मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी पात्र परिचारिकांचा सातत्याने पुरवठा करेल, त्यामुळे रुग्णालयांमधील परिचारिकांची कमतरता दूर होऊ शकेल. संबंधित भूखंडावरील इमारत यापूर्वी सी-१ (जीर्ण) म्हणून वर्गीकृत करण्यात आली होती. परंतु आता ती या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. जुन्या इमारती डागडुजी करून वापरात आणणे हाही एक उद्देश यामागे आहे.
वसतिगृहे आणि कर्मचारी निवासस्थाने सामावून घेणार
पहिल्या वर्षी किमान ५० विद्यार्थ्यांची तुकडी घेण्याची योजना आहे. चार मजली इमारतीमध्ये नर्सिंग महाविद्यालय, एक उपहारगृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि कर्मचारी निवासस्थाने सामावून घेतली जातील. हा भूखंड रुग्णालयाला लागून असल्याने कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल. आराखड्यामध्ये या सर्व सुविधांसाठी जागा पुरेशी मोठी आहे, अशी माहिती भाभा रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
निविदा प्रक्रिया लवकरच
प्रकल्प स्थळावर पाडकाम सुरू झाले असून वास्तुशिल्पासंदर्भात सल्लामसलत सुरू आहे. एफएसआयचे मूल्यांकन करण्यासाठी आणि लेआउट पर्याय सुचवण्यासाठी अनेक सल्लागारांशी संपर्क साधण्यात आला आहे. या बाबी निश्चित झाल्यावर, निविदा आणि बांधकाम टप्प्याटप्प्याने पुढे जाईल.