शहरं चांगली ठेवण्याची इच्छाशक्ती तरी दाखवाल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:17 IST2025-11-12T13:13:59+5:302025-11-12T13:17:28+5:30
Mumbai Municipal Corporation Election : पद्मश्री विजेत्यांच्या नजरेतून काय हवे या शहरातील सामान्य नागरिकांना? : रस्ते दर्जेदार हवे, कनेक्टिव्हिटी वाढवा, आरोग्य व्यवस्था सुधारा, सरकारी रुग्णालयांत अल्प दरात उपचार द्या, शहर बॅनरमुक्त करा, प्राथमिक शिक्षणावरील खर्च वाढवा, नवी मुंबईला एक कला दालन द्या, खेळांची मैदाने उपलब्ध करून द्या, मुलांना अभ्यासिका द्या...

शहरं चांगली ठेवण्याची इच्छाशक्ती तरी दाखवाल का?
पद्मश्री विजेत्यांच्या नजरेतून काय हवे या शहरातील सामान्य नागरिकांना? : रस्ते दर्जेदार हवे, कनेक्टिव्हिटी वाढवा, आरोग्य व्यवस्था सुधारा, सरकारी रुग्णालयांत अल्प दरात उपचार द्या, शहर बॅनरमुक्त करा, प्राथमिक शिक्षणावरील खर्च वाढवा, नवी मुंबईला एक कला दालन द्या, खेळांची मैदाने उपलब्ध करून द्या, मुलांना अभ्यासिका द्या...
‘गोल्डन अवर’ उपचारासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करा
- डॉ. अमित मायदेव, पोटविकार तज्ज्ञ
जन्मापासून मी मुंबईकर आहे. गिरगावात राहिलो. नायर रुग्णालयाशी संलग्न मेडिकल कॉलेजमध्ये जनरल सर्जरीचे शिक्षण घेतले. लहानपणापासून मुंबईचा विकास पाहत आलोय. मुंबईला देशातील इतर शहराच्या तुलनेत शिस्त असल्याचे दिसते. नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात. पण महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण केले पाहिजे. त्यासोबत या शहरातील रस्ते, जे मुंबईकरांची लाईफलाईन आहेत, ते तातडीने सुधारण्याची गरज आहे.
मुंबईत रहदारी इतकी आहे की कुणाला हार्टअटॅक आला तर उपचार देण्यासाठी ॲम्बुलन्सला जायला रस्ता नसतो. त्यामुळे या ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला अतितात्काळ रुग्णाला तातडीने उपचार देण्यासाठी आरोग्यव्यवस्था उभी करण्याची गरज आहे. महापालिकेचे बजेट मोठ्या प्रमाणावर असताना रस्ते का चांगले होत नाही? महापालिकेची नायर, केईएम आणि सायन ही तीन मोठी रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. एखाद्या उपकरणाचा काही पार्ट बिघडला तर तो मिळविण्यासाठी फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वर्षभराचा कालावधी जातो. संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतो, हे मला कळलेले नाही.
मतभेद सोडा अन् प्राथमिक शिक्षणासाठी निधी द्या
डॉ. जहीर काझी, शिक्षण तज्ज्ञ
प्राथमिक शिक्षण हा महापालिकेचा विषय आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून त्यावर उपाय कुणाकडेही नाही. मराठी शिक्षणावरील खर्च कमी झाला. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन प्राथमिक शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यायला हवा. शाळा बंद होत आहेत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही, खासगी शाळांना मोठा खर्च करणे परवडत नाही. मराठी शाळा बंद झाल्या तर पुढच्या पिढीला मराठी लिहायला, वाचायला येणार नाही. भाषा वाचली तर संस्कृती टिकेल.
चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हायला हवी. अनेक रुग्णालयात रुग्ण जमिनीवर झोपलेले आढळतात. एमआरआय, सिटीस्कॅन मशीन बंद अवस्थेत असतात. प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन बाबी देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. हीच देशाची ताकद आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देणे हीदेखील महापालिकेची जबाबदारी आहे. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या भागात एक सार्वजनिक वाचनालय सुरू करायला हवे. अत्यंत हलाखीत दिवस काढणाऱ्या पाल्यांना विशेषतः मुलांच्या आईला प्रौढशिक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण आणि त्याबरोबर कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्यास त्यांचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचवण्यास निश्चित मदत होईल.
महामार्गांवरील नाना, भाऊ यांचे ‘बॅनरयुद्ध’ थांबेल का?
-अच्युत पालव, सुलेखनकार
बेलापूरला एका ठिकाणी वळण घेत असताना मोठ-मोठ्या बॅनर्समुळे समोरून येणारी गाडी दिसत नाही. म्हणजे वाहनचालकाने खड्ड्यातून गाडी काढण्याकडे लक्ष द्यायचे की पुढील रस्ता आणि समोरून येणारी गाडी दिसते आहे का, ते पहायचे? महापालिका एवढ्या मोठ्या बॅनर्सना परवानगी देते कशी? नाना, भाऊ, काका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पूर्ण रस्त्याचे विद्रूपीकरण केलेले दिसते. अनेकदा महामार्गावर मधल्या जागेत इतके बॅनर्स लावलेले असतात की काही बॅनर्स पडून अपघातही होतात. कोणतीच महापालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असे वाटते.
माझे बालपण लालबागला गेले. येथे घरे लहान असल्याने लहान मुलांची अभ्यासाची मोठी अडचण होत असे. यासाठी लालबाग-परळ भागात स्थानिक रहिवाशी मंडळांनी मुंबई पालिकेच्या जागांवर अभ्यासिका बांधून घेतल्या. त्या अभ्यासिकेत किंवा कॉटन ग्रीन येथील एका मोकळ्या भूखंडावर आम्ही अभ्यास करायचो. महापालिकेने अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीसारखे एखादे कला दालन नाही. नवी मुंबईतील प्रत्येक कलाकाराला मुंबईत जावे लागते. याबाबत मी अनेकदा काही अधिकारी, आमदारांशी, खासदारांशी बोललो पण या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच कॅज्युअल आहे.
प्रत्येक महापालिका हद्दीत एक सायन्स सेंटर उभारा
- गजानन माने, समाजसेवक
मुंबईमध्ये नेहरू सायन्स सेंटर पाहण्यासाठी महानगर क्षेत्रातील विद्यार्थी लांबून येतात. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई अशा प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीत सायन्स सेंटर उभारली पाहिजेत. यामुळे आजच्या तरुण पिढीला जवळच्या ठिकाणीच शैक्षणिकबुद्धीला चालना देणाऱ्या काही चांगल्या गोष्टी पहायला मिळतील. अभ्यास करायला मिळतील.
सैनिकांचा तुटवडा हा एक विषय समोर येत आहे. सैनिक ही देशाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एक तरी सैनिक शाळा असायला हवी. सैनिक शाळेसाठी लागणारा निधी देण्यास राज्य सरकार तयार आहे. परंतु, जागा, सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका किंवा तत्सम संबंधित यंत्रणेने पुढाकार घेऊन अशा सैनिक शाळा सुरु कराव्या.
पाणी संकट दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी दुष्काळ आहे. तेथील पाणी संकटावर मात करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर, काही संस्था मोठे काम करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाणी वाहून वाया जाते. अशी ठिकाणे शोधून जिथे पाण्याची खरी गरज आहे तिथे वाया जाणारे पाणी वळते करण्यासाठी काही मार्ग काढता येईल का? याचा विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाचा मोठा प्रश्न आहे. त्यावर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या मदतीने उपाययोजनांचा विचार महापालिकेने करावा.
नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या
- उदय देशपांडे, मल्लखांब प्रशिक्षक
कमीत कमी वेळेत शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला मल्लखांब हा एकमेव क्रीडा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या नातीत उगम पावलेल्या या खेळाची सगळ्या महापालिकांनी मल्लखांब क्षेत्र उभी करायला हवीत. त्याचे प्रशिक्षक तयार करायला हवे. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, भाषा विषयांचे एखादे शिक्षक चांगले नसतील तर फार काय होईल? विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळतील. पण, मल्लखांबाचा शिक्षक चांगला नसेल तर विद्यार्थी खाली पडून त्याचे हात, पाय फॅक्चर होतील. त्याला अपंगत्व येईल. त्यामुळे चांगले शिक्षक तयार होणे गरजेचे आहे. मल्लखांब केंद्र सुरु करण्यास फार जागा लागत नाही पण ती ही मिळत नाही. नवीन फ्लाय ओव्हर्सखालील मोकळ्या जागा महापालिकेने मल्लखांब प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच, हा प्रकार जगभरात पोहोचण्यासाठी इकडे जे चांगले खेळाडू, प्रशिक्षक आहेत त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवून मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. एखादा विद्यार्था प्रशिक्षक बनला तर त्याला पुढे येऊन मदत करावी. त्याला सेंटर उघडून दिले तर या खेळाचा विकास होईल. रस्ते, शाळा, आरोग्य ही महापालिकेची कामे आहेतच. पण, लुप्त होत चाललेल्या गोष्टीचे जतन व त्या जपण्यासाठी उत्तेजन मिळावे.