Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मनपाच्या निकालावर राज ठाकरे बोलले, म्हणाले, मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दु:ख, पण…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:32 IST

Mumbai Municipal Corporation Election Results: शुक्रवारी जाहीर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांत राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षित कामगिरी करता आली. नाही त्यामुळे आता या पराभवाबाबत राज ठाकरे हे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज सकाळी राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं आहे.

संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने बाजी मारली. तर कडवी झुंज देणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात उद्धवसेनेने आश्वासक कामगिरी करत ६५ जागा जिंकल्या. मात्र राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षित कामगिरी करता आली. नाही त्यामुळे आता या पराभवाबाबत राज ठाकरे हे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज सकाळी राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं आहे.

या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की,  सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धवसेना आणि मनसेच्या ककार्यकर्त्यांचं कौतुक केलं.

यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या अपयशावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. तसेच मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की आहे, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी निवडणूक झाली तरी मराठीची लढाई सुरू राहील, असं सूचक विधान केलं.

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.  तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनसेच्या भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray Speaks on Mumbai Municipal Corporation Election Results

Web Summary : Raj Thackeray acknowledged MNS's disappointing performance in Mumbai's election. He lauded party workers' efforts against powerful opposition. Despite the setback, he vowed to fight for Marathi identity and interests, urging continued support and action.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकामनसेराज ठाकरे