मुंबई महानगरपालिकेतील ‘महापौर’पदाच्या निवडीवरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफुस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:18 AM2019-11-19T03:18:45+5:302019-11-19T06:27:39+5:30

स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापौरपदासाठी जोरदार प्रयत्न केले होते

Mumbai municipal corporation chooses to be the mayor | मुंबई महानगरपालिकेतील ‘महापौर’पदाच्या निवडीवरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफुस

मुंबई महानगरपालिकेतील ‘महापौर’पदाच्या निवडीवरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफुस

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली असली तरी त्यांच्या निवडीमुळे या पदासाठी इच्छुक ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफुस असल्याचे पाहायला मिळत आहे.

स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापौरपदासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यानुसार सोमवारी स्थायी समितीची शेवटची बैठक घेऊन त्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील व महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील, अशी चर्चा होती. मात्र जाधव यांना दोनदा स्थायीचे अध्यक्षपद, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना आमदारकी मिळाल्याने पुन्हा महापौरपदासाठी त्यांचेच नाव पुढे आल्यामुळे काही ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी होती. तर किशोरी पेडणेकर यांच्या नावालाही काही ज्येष्ठ नगरसेवकांनी नापसंती दर्शवली होती.

डिलाईल रोड, धोबीघाट या परिसराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका पेडणेकर यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत विधानसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना महापौरपद मिळावे यासाठी पक्षातील एक गट सक्रिय होता. नाराजांना शांत करण्यासाठी अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

भाजपची माघार
राज्यात शिवसेना-भाजपचे सूर बिघडल्याने भाजप विरोधी बाकावर बसण्याची चिन्हे आहेत. महापौरपद मिळवण्यासाठी काँग्रेसला हाताशी धरून भाजप आपला उमेदवार देईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने महापौरपदासाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे महापौरपदासाठी आमचा उमेदवार उभा करणार नाही. मात्र २०२२ मध्ये आवश्यक संख्याबळ प्राप्त करून आमचा महापौर निवडून आणू, असा विश्वास खासदार व पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षाचाही उमेदवार नाही
काँग्रेस-राष्ट्रवादीनेही या वेळेस महापौरपदासाठी आपला उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने किशोरी पेडणेकर यांची निवड बिनविरोध होणार आहे. या पदासाठी आवश्यक संंख्याबळ नसल्यामुळे उमेदवार उभा न करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले.

किशोरी पेडणेकर यांचा परिचय
१९८२ पासून शिवसेनेच्या कार्यकर्त्या असलेल्या किशोरी पेडणेकर या आतापर्यंत तीनवेळा वेगवेगळ्या मतदारसंघांतून नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग समिती अध्यक्ष, महिला व बाल कल्याण समिती आणि स्थापत्य समिती (शहर)चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे शिवसेनेचे प्रवक्तेपदही त्यांना देण्यात आले होते.

Web Title: Mumbai municipal corporation chooses to be the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.