Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका : सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जन करिता कृत्रिम तलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 14:20 IST

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

मुंबई : कोरोनाचा धोका वाढतच आहे. अशावेळी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. हे निर्णय घेतले जात असतानाच सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने कुर्ला येथील नागरिकांसाठी नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात गणपती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यावर कुर्ला येथील एल वॉर्ड मधील सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी मागणी मान्य करून पुढील कार्यवाही करिता त्यांच्या वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मैदाने, उद्याने आणि सोसायटी परिसरात कृत्रिम तलावांस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधींनी देखील यास साथ दिली आहे. कुर्ला येथील समस्यांबाबत मुंबई महापालिकेच्या एल विभागामध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांनी सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी या मुद्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. कुर्ला पूर्व -पश्चिम जोडणारा भुयारी मार्गाच्या देखभाली बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबत लवकरच रेल्वे, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. कुर्ला पश्चिम तकिया वॉर्ड मध्ये होत असलेल्या पाण्याच्या समस्येबाबत तातडीने तोडगा काढावा, असे सहाय्यक अभियंता जलकामे कुलकर्णी यांना यावेळी सांगितले. तसेच इतर विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत पाऊले उचलण्यात येत असून, आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढल्या जाऊ नयेत, असे आवाहन केले जात आहे. विसर्जनाचा विचार करता मुंबईत गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवासह ८४ स्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. शिवाय ३४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. खेळाचे मैदान, क्रिडांगणे, वाहतूक तळ, मोकळे भूखंड येथे कृत्रिम तलाव बांधून दिल्यास गर्दी कमी होईल, असे म्हणणे मांडले जात आहे. दरम्यान, २००७ मध्ये कृत्रिम तलावांची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर होऊ लागला. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेशोत्सवलॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्या