मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:41 IST2026-03-12T06:41:00+5:302026-03-12T06:41:48+5:30
मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात
मुंबई : मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या ५.४० लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात आहे.
महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर गॅस सिलिंडर टंचाईचे संकट आहे. गॅस पुरवठा कंपन्यांनी सेवाभावी संस्थांना व्यावसायिक गटात धरून एलपीजी सिलिंडर देण्यास मनाई केल्याने भोजनावर परिणाम होण्याची भीती प्राथमिक शिक्षण संचालकांना लिहिलेल्या तातडीच्या पत्रात व्यक्त केली आहे. एका मोठ्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी संस्थांना १८०० ते १९०० रुपये द्यावे लागतात. २००० ते ४००० विद्यार्थ्यांच्या गटासाठी १ सिलिंडर तर ७००० ते १०००० विद्यार्थ्यांच्या गटासाठी २ सिलेंडर लागतात.
सेवाभावी संस्थांना अडचणी
२०१२ मध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या संस्थांना एलपीजी गॅसवर सबसिडी दिली जात होती. मात्र नंतर ही सुविधा बंद करण्यात आली. सध्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी घरगुती सिलिंडरचा पुरवठा व्यावसायिक वापरासाठी न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्थांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सर्व महिला संस्थांनी गॅस टंचाईबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाला कळविले. गॅस टंचाई किमान एक ते दीड महिना राहण्याची शक्यता आहे.
‘या’ कॅन्टीनमध्ये पोटपूजा करणाऱ्यांना आता उपवास?
मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनला इंधन टंचाईची झळ बसली आहे. कॅन्टीनमधील गॅस सिलिंडरचा साठा संपल्यामुळे गुरुवारपासून येथील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. १,५०० लोकांना उपवास घडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दररोज हजारो लोक आपल्या कामासाठी येत असतात. बाहेरून कामासाठी येणारे मुंबईकर आणि पालिकेचे कर्मचारी यांना पोटपूजा करण्यासाठी पालिकेच्या कॅन्टीनचा मोठा आधार आहे. मात्र, गॅस टंचाईची झळ या कॅन्टीनलाही बसली. परिणामी पंधराशे लोकांना उपाशी राहावे लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
बुधवारीच गॅस सिलिंडरचा साठा संपलेला आहे. मागणी नोंदवही अद्याप सिलिंडर उपलब्ध झालेला नाही, अशी माहिती कॅन्टीन व्यवस्थापनातील एका सदस्याने दिली.