मुंबई मनपा आयुक्त परदेशी यांची तडकाफडकी बदली; आय.एस. चहेल नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:12 AM2020-05-09T04:12:06+5:302020-05-09T04:12:19+5:30

मंत्रालयातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून अनेकांना पोस्टिंगच नाही, अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिले होते

Mumbai Municipal Commissioner Pardeshi suddenly replaced; I.S. Chahel new commissioner | मुंबई मनपा आयुक्त परदेशी यांची तडकाफडकी बदली; आय.एस. चहेल नवे आयुक्त

मुंबई मनपा आयुक्त परदेशी यांची तडकाफडकी बदली; आय.एस. चहेल नवे आयुक्त

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन प्रवीणसिंह परदेशी यांना तातडीने दूर करण्यात आले असून त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परदेशी यांना चहेल यांच्या जागी नगरविकास विभागात पाठविण्यात आले आहे. मुख्य सचिव अजय मेहता आणि परदेशी यांच्यातील कलह, मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आल्याची घटना, ही परदेशी यांच्या बदलीमागची कारणे असल्याची चर्चा आहे.

मंत्रालयातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून अनेकांना पोस्टिंगच नाही, अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिले होते. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मेट्रो प्रकल्पातून बदली करण्यात आल्यापासून अश्विनी भिडे, तर ठाण्याच्या मनपा आयुक्तपदावरुन बदली झाल्यापासून संजीव जयस्वाल हे दोन वरिष्ठ सनदी अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. आता भिडे आणि जयस्वाल यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे. वित्त विभागालाही पूर्णवेळ सचिव नव्हता. मनोज सौनिक यांच्याकडेच बांधकाम विभाग व वित्त विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता बांधकाम विभागाचे सचिव म्हणून किशोरराजे निंबाळकर यांना नेमण्यात आले असून सौनिक यांना वित्त विभागाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. चहेल, सौनिक व निंबाळकर हे तीनही अधिकार अजोय मेहतांच्या जवळचे मानले जातात. याआधी चहेल यांना मुंबई महापालिकेत पाठवण्याच्या हालचाली चालू होत्या. याशिवाय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जराड यांची महसूल व वन विभागाचे सचिवपदी, तर मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांची एमएसएसआयडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टरपदी बदली करण्यात आली आहे.

Web Title: Mumbai Municipal Commissioner Pardeshi suddenly replaced; I.S. Chahel new commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.