मुंबई : मुंबई महापालिकेने सोमवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत खासगी टँकर व विहिरी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन बंद मागे घेतला. त्यामुळे विहिरी, कूपनलिका तसेच टँकर ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती
केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने पालिकेने बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, नियम पाळल्यास विहिरी व कूपनलिकाधारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा मागे घेण्याचे पालिकेने ठरवले आहे.
आयुक्त आणि टँकरचालक संघटनेच्या बैठकीला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ व टँकर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. तसेच भूजल प्राधिकरणाकडे बाजू मांडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी विनंती संघटनेने आयुक्तांना केली.