Mumbai: गोरेगावमधील 'हा' उड्डाणपूल पाडण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:27 IST2025-09-12T13:27:00+5:302025-09-12T13:27:27+5:30
हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. रेडिसन हॉटेलपासून 'रुस्तमजी ओझोन' परिसरापर्यंत हा पूल आहे.

Mumbai: गोरेगावमधील 'हा' उड्डाणपूल पाडण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय
मुंबई : महापालिकेने २०१८ मध्ये २७कोटी रुपये खर्चुन बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल विस्तारित कोस्टल रोड प्रकल्प कामांमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल आता पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सावरकर उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. रेडिसन हॉटेलपासून 'रुस्तमजी ओझोन' परिसरापर्यंत हा पूल आहे. गोरेगाव आणि मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला आहे.
स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांसाठी हा पूल महत्त्वाचा दुवा ठरल्याने त्यांचा हा पूल पाडण्यास विरोध आहे. परंतु, आता हाच पूल कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दुमजली पुलाचा प्रस्ताव
कोस्टल रोडसाठी हा पूल पाडल्यानंतर त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत जाईल, तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणी मिळणार आहे. तसेच, कोस्टल रोडमधून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
...तर खर्चात वाढ?
विस्तारित कोस्टल रोडसाठी सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतल्याने याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे पालिका काय निर्णय घेते आणि आराखड्यात काही बदल करते का, याकडे सर्वांचे लक्ष होते.
मात्र, हा पूल पाडल्याशिवाय पर्यायच नाही. त्याचप्रमाणे जर हा पूल तसेच ठेवून काम केल्यास विस्तारित कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च वाढेल आणि वेळही अधिक वाढून प्रकल्पाचे काम लांबणीवर पडेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.