Join us  

भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 5:13 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक जवळपास दोन तास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ठळक मुद्देराज ठाकरे आणि आशीष शेलार यांच्यात 2 तास बैठकभाजपा शिवसेनेऐवजी मनसेसोबत हातमिळवणी करणार?

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन तास ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आशीष शेलार यांनी सोमवारी (31 डिसेंबर) 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांची भेट घेतली.  मात्र, राज ठाकरे आणि आशीष शेलार यांच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. 

तर दुसरीकडे, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या विषयावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीसाठी भाजपाकडून शिवसेनेऐवजी आता अन्य पर्यायांचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. कारण राज्यासहीत केंद्रातील सत्तेत एकत्र नांदत असतानाही शिवसेना सतत विरोधकांच्या भूमिकेत राहून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न करते आहे.  

50-50 जागावाटपाचं समीकरण लावून धरणं किंवा वारंवार स्वबळाचे नारे देणे, यामुळे शिवसेना-भाजपाच्या युतीच्या दोस्तीत कुस्ती सतत पाहायला मिळतेच. इतकंच नाही तर भाजपासोबत सत्तेत सहभागी असूनही शिवसेना सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आली आहे. यामुळे या मित्रपक्षांमधील  फूट वाढत जातेय.

शिवसेनेसोबत होणारे हे वाद पाहता आता शिवसेनेची मनधरणी करत बसण्याऐवजी आता भाजपाकडून नवीन पर्याय म्हणून 'मनसे'सोबत हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का?, अशी चर्चा आता राज्यातील राजकारणात रंगली आहे.

दरम्यान, या दोघांमध्ये कौटुंबिक विषयावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा 27 जानेवारीला विवाहसोहळा आहे. त्यामुळे अमित यांच्या विवाहसोहळ्याला भाजपाकडून कोणाला बोलवायचे, यावर चर्चा झाल्याची म्हटले जात आहे. अमित यांचे लग्न लोअर परेल परिसरातील सेंट रेजिस येथे विवाहसोहळा पार पडणार आहे.  

टॅग्स :राज ठाकरेआशीष शेलारमनसे