Dadar Ratnagiri Passenger Train News: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल पुनश्च दादर स्थानकातून सुरु करण्यात यावी तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलास द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी आणि कुटुंबियांसाठी दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ एक रेल्वे नव्हती, तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. मागील २५–३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादर स्थानकापर्यंत धावत होती. परंतु कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित केली. यामुळे दैनंदिन कामकाज उरकून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर ठरणाऱ्या या गाडीची सेवा दिवा पर्यंतच सीमित करण्यात आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक
दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे, ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदार यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, खासदार वायकर यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या विषयावर सविस्तर निवेदन रेल्वे मंत्री पाठवले होते. परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. हा केवळ रेल्वेचा मुद्दा नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय असल्याने, यात लक्ष घालून दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल तात्काळ पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शक्य असल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वाढवावी, ज्यामुळे मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Web Summary : MP Ravindra Waikar urges Railway Minister to reinstate Dadar-Ratnagiri passenger train from Dadar and extend it to CSMT for convenience of Konkan travelers facing hardship since service curtailed to Diva.
Web Summary : सांसद रवींद्र वायकर ने रेल मंत्री से दादर-रत्नागिरी पैसेंजर ट्रेन को दादर से फिर शुरू करने और CSMT तक बढ़ाने का आग्रह किया, क्योंकि दिवा तक सेवा कम होने से कोंकण यात्रियों को कठिनाई हो रही है।