‘मोनो’ला मिळाली अखेर ‘पॉवर’; लवकरच धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:19 IST2026-01-06T12:18:53+5:302026-01-06T12:19:34+5:30
२९६ कोटी रुपयांची सर्वांत कमी किमतीची निविदा ‘पॉवर मेक’ची

‘मोनो’ला मिळाली अखेर ‘पॉवर’; लवकरच धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल मार्गिकेचे संचलन आणि देखभालीचे कंत्राट ‘पॉवर मेक प्रोजेक्ट्स’ कंपनीला मिळणार आहे. कंपनीची २९६ कोटी रुपयांची कमीतकमी किमतीची निविदा खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मोनो चालविण्यासाठी नवा कंत्राटदार नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोनोचे संचलन खासगी कंपनीकडे देण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) जुलैमध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात अदानी इन्फ्रास्ट्रक्चर, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, इंडवेल कन्स्ट्रक्शन आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स या कंपन्यांचा समावेश होता.
तांत्रिक छाननीत यातील कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने किमान तांत्रिक स्कोर मिळविला नाही. तर इंडवेल कन्स्ट्रक्शनला पात्रता निकष पूर्ण करता आले नाहीत. त्यामुळे अदानी इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स यांच्या निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यात अदानीने ३०८ कोटींची, तर पॉवर मेक कंपनीने २९६ कोटी रुपयांची निविदा भरली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पॉवर मेक प्रोजेक्ट्सला काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो मार्गिकेची लांबी २० किमी असून त्यावर १८ स्थानके आहेत. मोनोरेल उभारणीसाठी ३०२५ कोटी रुपयांचा खर्च आला होता. पहिल्या टप्प्यात चेंबूर ते वडाळा या मार्गावर २०१४ पासून मोनो धावू लागली. पहिल्या वर्षी मोनो संचलनातून ४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला.
मोनो सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा
बिघाडांचे ग्रहण लागल्याने आणि मार्गिकेवर नवी यंत्रणा बसविण्यासाठी २० सप्टेंबरपासून ती अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. मोनोरेलच्या ताफ्यात नव्याने दाखल केलेल्या १० गाड्यांच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मोनोरेल पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने या चाचण्या सुरू केल्या. तसेच जुनी यंत्रणा काढून नवीन यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मोनो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मोनोला प्रवाशांचा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रवासीच नसल्यामुळे मोनो ठरली ‘पांढरा हत्ती’
मोनोचे दोन्ही टप्पे सुरू झाल्यावर उत्पन्न वाढीची अपेक्षा होती. मात्र मोनोरेलला अपेक्षित प्रवासी न मिळाल्याने ती तोट्यात गेली. त्यातच मोनोचे संचलन करणारी स्कोमी इंजिनिअरिंग कंपनी २०१८ मध्ये आर्थिक गोत्यात आल्यानंतर २०१९ पासून मोनोचे संचलन एमएमआरडीएकडे आले. मात्र त्यानंतरही प्रवासी संख्या फारशी वाढली नाही. मोनोवर केवळ १५ हजार ते २० हजार प्रवासी प्रवास करतात.
पाच वर्षांचे कंत्राट : कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी संपूर्ण मोनोरेल मार्गिका चालवावी लागणार आहे. यामध्ये मोनोचे परिचालन, स्थानक व्यवस्थापन, डेपो हाताळणी, गाड्यांची देखभाल दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.