मुंबईतील कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकरे गटाच्या नेत्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत पाताडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा उपविभाग प्रमुख आहे. आरोपीने गेल्या महिन्यात १७ मार्चला पीडित मुलीचा (वय, १७) विनयभंग केला होता. पंरतु, पीडिताने बरेच दिवस हा प्रकार आपल्या पालकांपासून लपवून ठेवला. अखेर तिने धाडस करत आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पीडिताच्या आई-वडिलांनी ताबडतोब कांजूरमार्ग पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आरोपीविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.