Join us  

मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 2:57 PM

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून हिरवा कंदील, दहिसरकरांनी व्यक्त केले आभार

ठळक मुद्देदहिसर क्षेत्र विस्तृत असले तरी मेट्रो स्थानक हे पूर्णपणे आनंदनगरच्या सीमेत आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर हे नाव देणे स्थानिकांना मान्य नव्हते.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - मेट्रोच्यादहिसर येथील आनंद नगरच्या परिसरात असलेल्या मेट्रोच्या स्थानकाच्या अप्पर दहिसर स्थानकाचे नामकरण अखेर आनंद नगर असे करण्यात आले आहे. याबाबत विविध पक्षाच्या लोकांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा करत स्थानकाचे नाव बदलण्याबाबत विनंती पत्र दिले होते. त्यानुसार हे नाव बदलण्यात आले आले असून याबाबत दहिसरकरांनी प्रशासनाचे  आभार मानले आहेत. अंधेरी पश्चिम डी एन नगर दहिसर मेट्रो २ च्या ट्रायल रनचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र दहिसरमध्ये स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये असंतोष व्यक्त होत होता.

दहिसर क्षेत्र विस्तृत असले तरी मेट्रो स्थानक हे पूर्णपणे आनंदनगरच्या सीमेत आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर हे नाव देणे स्थानिकांना मान्य नव्हते. त्यानुसार या नावाला त्यांच्याकडून विरोध सुरू होता. याबाबत विविध पक्षाच्या शिष्टमंडळानी एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन देत नाव बद्दलण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार एमएमआरडीए आयुक्तांनी १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स्थानिकांच्या या मागणीबाबत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पत्र दिले होते. ज्याच्या उत्तरात त्यानी ही विनंती मान्य करत २४ नोव्हेंबर,२०२१ रोजी या स्थानकाचे नाव आता अप्पर दहिसर न राहता आनंदनगर मेट्रो स्टेशन करण्यात आले असुन याच नावाचा वापर पुढील सर्व अधिकृत प्रक्रियेसाठी करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :मेट्रोमुंबईएमएमआरडीएदहिसर