Siddhivinayak Metro Entry Exit Points: मुंबईच्यामेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाइनचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी असा दुसरा टप्पा नुकताच सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानकाचाही समावेश आहे. हे मेट्रो स्थानक आता या टप्प्यातील महत्त्वाचं स्थानक ठरत आहे. कारण सिद्धिविनायक मंदिर परिसर तसा रेल्वे स्थानकापासून दूर आहे. त्यामुळे प्रवाशांना दादर रेल्वे स्थानकात उतरुन पुढचा प्रवास टॅक्सी किंवा बसने करावा लागतो. यात वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. पण आता अगदी सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूलाच मेट्रो स्थानक असल्याने प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे.
सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानकाचं महत्व लक्षात घेता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं (MMRC) या स्थानकासाठी एकूण ७ एन्ट्री आणि एग्झिट मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. जेणेकरुन प्रवाशांना सहज आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल.
सिद्धिविनायक मेट्रो स्थानकामुळे प्रवाशांना सिद्धिविनायक मंदिर, रविंद्र नाट्य मंदिर, हॉटेल कोहिनूर पार्क, रचना संसद अकादमी, दादर चौपाटी या ठिकाणांवर सहज पोहोचता येणार आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाला A1, A2,A3,A4,A5 आणि B1, B2 असे एकूण ७ एन्ट्री आणि एग्झिट मार्ग आहेत. ज्याचा वापर करुन प्रवाशांना सहज मेट्रो स्थानकात पोहोचता येऊ शकतं. यातील दोन मार्ग हे सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूच्या मुख्य मार्गालगत, दोन रविंद्र नाट्य मंदिराजवळ आहेत.
एमएमआरसीकडून या स्थानकाचे काही सुंदर फोटोही ट्विट करण्यात आले होते. ज्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन, सुसज्ज व्यवस्था आणि भव्यता दिसून आली होती. शहरातील सर्वात गर्दीच्या परिसरात बांधलेलं हे स्टेशन, काळजीपूर्वक नियोजन पद्धतीनं तयार केलेलं आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, प्रगत पायाभूत सुविधा आणि अचूक नियोजन यामुळे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन मुंबईचं एक महत्त्वाचे स्टेशन बनण्यास सज्ज झालं आहे.