Join us  

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली; एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:41 AM

खरेदीचा मार्ग झाला मोकळा.

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबईमेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी दिवाळखोरीत निघण्यापासून बचावली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचे कर्ज फेडणार असल्याची हमी दिल्याने आता या मेट्रो मार्गिकेच्या थकित कर्जप्रकरणी बँकांनी सुरू केलेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने निकाली काढली आहे. त्यामुळे आता मेट्रो १ मार्गिका खरेदीचा एमएमआरडीएचा मार्ग माेकळा झाला आहे.

मेट्रो १ मार्गिकेची खासगी-सार्वजनिक भागीदारी पद्धतीने बांधा-वापरा स्वामित्व घ्या आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारली होती. या मेट्रो मार्गिकेवरून जून २०१४ मध्ये प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. मेट्रो १ प्रकल्पाच्या उभारणीसाठी २ हजार ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात रिलायन्स इन्फ्राची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. ही मेट्रो मार्गिका खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली; मात्र एमएमआरडीएने स्वतःच्या निधीतून ही मेट्रो मार्गिका खरेदी करावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. 

त्यानुसार एमएमआरडीएकडून मेट्रो १ मार्गिका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बँकांनी या एकरकमी कर्ज फेडीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर एमएमओपीएलवरील दिवाळखोरीची प्रक्रिया टळली आहे. दरम्यान, याबाबत एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सहा बँकांचे १,७११ कोटी कर्ज- 

१) एमएमओपीएलकडून संचालन केल्या जाणाऱ्या मेट्रो १ मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. याबाबत एमएमओपीएल आणि बँका यांच्यामध्ये १५ मार्चला बैठक पार पडली होती. २) बैठकीत कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर तत्त्वतः सहमती झाली होती. त्यानंतर बँकांनी या एकरकमी कर्जफेडीला तत्त्वत: संमती असल्याचे १८ मार्चला पार पडलेल्या अन्य एका बैठकीत कळविले होते. 

३) बैठकीतील निर्णयानुसार एमएमआरडीएने १० टक्के कर्जाची म्हणजेच सुमारे १७५ कोटी रुपयांची परतफेड बँकांना केली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांचा समावेश आहे. 

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीएघाटकोपरवर्सोवा