Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:22 IST2025-05-24T10:20:10+5:302025-05-24T10:22:00+5:30
Mumbai Local Mega Block 25 May 2025: अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या दरम्यान काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
Mumbai Local Mega Block News :मुंबईची लोकल ट्रेन ही सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे. मुंबईकरांना इच्छित जागी वेळेवर पोहोचवणारी लोकल ट्रेन प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, या रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. काही अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या दरम्यान काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जर, तुम्ही देखील रविवारी प्रवास करण्याची योजना आखली असेल, तर गाड्यांच्या वेळा तपासायला विसरू नका.
रविवारी, २५ मे २०२५ रोजी मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर या मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचे वेळापत्रक
मध्य रेलवेकरील माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या ट्रेन (स्लो ट्रेन) माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर त्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.
सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबतील. माटुंगा स्थानकावर या गाड्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या नियोजित १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून निघणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ट्रान्स-हार्बर मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक
ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. या काळात वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सकाळी १०.३० ते संध्याकाळी ४.०७ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरूळ/पनवेलसाठी डाऊन लाईन गाड्या आणि सकाळी १०.२५ ते संध्याकाळी ४.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरूळ/वाशीहून ठाण्याला जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.