मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८८ आणि शिंदे गटाने २८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तब्बल अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचा गड अखेर कोसळला असून आता महायुतीचा महापौर मुंबईच्या ऐतिहासिक खुर्चीवर विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, मुंबईकरांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की, हा नवा महापौर नेमका कधी आणि कसा निवडला जाणार?
कधी होणार महापौरांची निवड?
मुंबईच्या महापौरांची निवड होण्यासाठी आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असून, प्रजासत्ताक दिनानंतर म्हणजेच २६ जानेवारीनंतर महापौर निवडीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला आपला नवा 'प्रथम नागरिक' मिळण्याची दाट शक्यता आहे.
Mumbai Mayor Salary: मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात?
महापौर निवडीची प्रक्रिया कशी असते?
मुंबईच्या महापौरांची निवड थेट जनतेतून होत नाही. त्यासाठी एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते.
नगरसेवकांमधून निवड: महापालिकेवर निवडून आलेले २२७ नगरसेवक आपल्यामधून एकाची महापौर म्हणून निवड करतात.
बहुमताचा आकडा: ज्या पक्षाकडे किंवा युतीकडे ११४ पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांचाच महापौर निवडला जातो. सध्या महायुतीकडे हे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
आरक्षणाची सोडत: महापालिका आयुक्त लवकरच महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करतील. हे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे की राखीव, हे या सोडतीवरून स्पष्ट होईल.
निवडणूक प्रक्रिया: त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले जातात आणि महापालिकेच्या सभागृहात मतदान होऊन नव्या महापौरांची घोषणा केली जाते.
महापौरांची जबाबदारी काय असते?
मुंबईचा महापौर हा शहराचा 'प्रथम नागरिक' असतो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभांचे अध्यक्षपद भूषवणे, शहरातील नागरी प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि महत्त्वाच्या प्रस्तावांवर मतदान घेणे, ही त्यांची मुख्य कामे असतात. महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. केवळ मानद पद असले तरी, मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराचे प्रतिनिधित्व करत असल्याने या पदाला प्रचंड राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा आहे.
महायुतीचा 'गेम प्लॅन'
भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत मराठी अस्मिता आणि विकास या दोन मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती. आता मुंबईचा महापौर हा मराठीच असावा, यावर महायुतीचे एकमत झाले आहे. त्यामुळे भाजपमधील एखाद्या ज्येष्ठ आणि अनुभवी मराठी चेहऱ्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : Mumbai will soon elect a new mayor after a long period. The election process, involving councilor votes and reservation draws, is expected to conclude by February. The mayor, Mumbai's first citizen, holds a largely ceremonial yet prestigious role. Mahayuti aims for a Marathi candidate.
Web Summary : मुंबई जल्द ही एक लंबे अंतराल के बाद नया मेयर चुनेगा। पार्षद वोटों और आरक्षण ड्रॉ से जुड़ी चुनाव प्रक्रिया फरवरी तक पूरी होने की उम्मीद है। मेयर, मुंबई का पहला नागरिक होता है, जिसके पास काफी हद तक औपचारिक लेकिन प्रतिष्ठित भूमिका होती है। महायुति का लक्ष्य मराठी उम्मीदवार है।